लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : भरधाव ट्रकने दुचाकीला जाेरदार धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य दाेघे गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना खापा परिसरात बुधवारी (दि.२) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
आकाश नत्थू मरकाम (३४, रा. अंबाझरी, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव असून, गाेपाल हरी भलावी (२८) व गीता आकाश मरकाम दाेघेही रा. अंबाझरी, अशी जखमींची नावे आहेत. गाेपाल भलावी हा आकाश व गीतासह आपल्या एमएच-४०/बीडी-९४८० क्रमांकाच्या दुचाकीने अंबाझरी येथून सावनेरकडे जात हाेता. दरम्यान, खापा नजीकच्या जवाहर हायस्कूल टी-पाॅईंट परिसरात सावनेरकडून येणाऱ्या एमएच-४०/बीएल-६९०१ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने आकाशचा जागीच मृत्यू झाला, तर गाेपाल व गीता हे दाेघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अजय मानकर व पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना सावनेर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात पाठविले.
याप्रकरणी खापा पाेलिसांनी आराेपी ट्रक चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सुरू केला आहे.