विदर्भातही एकरी १०० टन उसाचे उत्पादन शक्य
By Admin | Updated: December 6, 2014 02:46 IST2014-12-06T02:46:44+5:302014-12-06T02:46:44+5:30
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भ-मराठवाड्यातसुद्धा एकेरी १०० टन उसाचे उत्पादन सहज शक्य आहे.

विदर्भातही एकरी १०० टन उसाचे उत्पादन शक्य
नागपूर : पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भ-मराठवाड्यातसुद्धा एकेरी १०० टन उसाचे उत्पादन सहज शक्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ आपली नकारात्मक मानसिकता बदला, असे आवाहन ज्येष्ठ ऊस तज्ज्ञ पांडुरंग आव्हाड यांनी येथे केले. रेशीमबाग मैदानावर आयोजित अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात शुक्रवारी डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या महर्षी सभागृहात ‘ऊस उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
पांडुरंग आव्हाड यांनी स्वत:चे अनुभव कथन केले. सध्या विदर्भातील शेतकरी उसाचे एकेरी ४० टनउत्पादन घेतात. परंतु योग्य पद्धतीने लागवड केली, त्यांची निगा राखली गेली तर एकेरी १०० टनापर्यंत उत्पादन घेता येते. पश्चिम महाराष्ट्रात अनेक शेतकरी याप्रकारे उत्पादन घेतात. त्यामुळे नकारात्मकता सोडा आणि कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. तुळजापूर, उस्मानाबाद येथील अनेक शेतकऱ्यांनी या पद्धतीने प्रयत्न करून आपल्या शेतात एकेरी १०० टनापेक्षा अधिक उत्पादन केल्याचे काही उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. अॅग्रोव्हिजन संयोजन समितीचे सदस्य आनंदराव राऊत यांनी संचालन केले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनीही या कार्यशाळेला भेट दिली. पूर्ती साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर दिवे, आर.डी. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)