लाचखोर वाळकेला एक दिवसाचा पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:12 IST2021-01-16T04:12:39+5:302021-01-16T04:12:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ५० हजारांची लाच स्वीकारणारा लाचखोर जिल्हा समाजकल्याण अधिकारी अनिल श्रावण वाळके (वय ५६) ...

लाचखोर वाळकेला एक दिवसाचा पीसीआर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ५० हजारांची लाच स्वीकारणारा लाचखोर जिल्हा समाजकल्याण अधिकारी अनिल श्रावण वाळके (वय ५६) याला न्यायालयाने एक दिवस एसीबीची कोठडी मंजूर केली. दरम्यान, त्याच्या वर्धा येथील घरझडतीत काहीच मिळाले नाही, त्यामुळे एसीबीचे पथकही चक्रावले आहे.
विशेष मुलांच्या शाळेत अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या उमेदवाराला कायमस्वरूपी पद मान्यता देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी आरोपी वाळकेने ५० हजारांची लाच मागितली होती. लाच दिली नाही तर तुझा प्रस्ताव पुढे सरकणार नाही, असेही सांगितले होते. त्यामुळे पीडित उमेदवाराने त्याची एसीबीकडे तक्रार केली. शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने वाळकेला गुरुवारी दुपारी ५० हजारांची लाच स्वीकारल्यानंतर अटक केली. त्याच्या मनीषनगरातील सदनिकेत तसेच वर्धा येथील आलिशान निवासस्थानी एसीबीच्या पथकाने झाडाझडती घेतली. आश्चर्य म्हणजे, या दोन्ही ठिकाणी एसीबीच्या पथकाला रोख रक्कम, दागिने, लॉकर किंवा बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे असे काहीही आढळून आले नाही. या प्रकारामुळे एसीबीचे अधिकारी चक्रावले आहेत. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती आहे. ती वडिलोपार्जित की अशाच लाचखोरीतून त्याने ती जमविली, त्याचा आता एसीबीचे पथक शोध घेत आहे. आरोपी वाळकेचे व्हाॅइस सॅम्पल एसीबीने घेतले असून, पीसीआरमध्ये आणखी काही मिळेल, असा एसीबीला विश्वास आहे.
--
साथीदारांनी केली व्यवस्था?
वर्धेच्या निवासस्थानी त्याची आई आणि पत्नी राहतात. वर्धेत वाळकेचे मोठे नेटवर्क आहे. त्याला एसीबीने जेरबंद केल्यानंतर त्याच्या पंटरने ही बातमी तातडीने वर्धेत पोहोचवली असावी आणि त्याच्या साथीदारांनी वर्धेतील त्याच्याकडची रोकड तसेच माैल्यवान चीजवस्तू पद्धतशीरपणे इकडेतिकडे लपविण्याची व्यवस्था केली असावी, असा संशय आहे.
---