उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’वर होतोय एक कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2022 08:00 IST2022-12-07T08:00:00+5:302022-12-07T08:00:05+5:30
Nagpur News उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्याच्या सुरक्षेसाठी चौफेर १० फूट उंचीची सुरक्षा भिंत उभारली जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’वर होतोय एक कोटींचा खर्च
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्याच्या सुरक्षेसाठी चौफेर १० फूट उंचीची सुरक्षा भिंत उभारली जात आहे. उपमुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळांशी चर्चा करता यावी यासाठी कॉन्फरन्स हॉल बांधला जात आहे. सोबत उपमुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क स्टेशन’ही बांधले जात आहे. या सर्व कामांवर सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. गृहमंत्रीपदही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेत एसबीने तीन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून ‘देवगिरी’ला चौफेर सुरक्षा भिंत उभारण्याची सूचना केली होती. त्यानुसार पीडब्ल्यूडीने देवगिरीच्या चारही बाजूने १० फूट उंचीच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू केले आहे. १८० मीटर लांबीच्या या भिंतीच्या बांधकामावर ४६ लाख रुपये खर्च होणार आहेत. भिंतीवर काटेरी तारेचे कुंपणही राहणार आहे.
३४ लाखांचा कॉन्फरन्स हॉल
- देवगिरीच्या समोर लॉन आहे. मात्र, येथे मोठा कॉन्फरन्स हॉल नाही. उपमुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्या शिष्टमंडळांना बसण्यासाठी, अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी आता येथे ३० बाय ८० फुटांचा कॉन्फरन्स हॉल बांधण्यात येत आहे. या हॉलमध्ये सुमारे ३०० लोक बसू शकतील. यावर ३४ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क स्टेशन’
- आजवर अधिवेशन काळातच उपमुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी देवगिरीवर कार्यरत असायचे. आता फडणवीस हे नागपूरचे असल्यामुळे त्यांचे देवगिरीवरील कार्यालय नियमित सुरू राहणार आहे. येथील जुने कार्यालय कर्मचाऱ्यांसाठी अपुरे पडत आहे. त्यामुळे या कार्यालयाचा विस्तार करून ३० कर्मचारी बसू शकतील असे ‘वर्क स्टेशन’ बांधले जात आहे. त्यासाठी २५ बाय २५ फुटांचा स्वतंत्र हॉल उभारण्यात येत असून यावर १८ लाख रुपये खर्च केले जात आहेत.