दीड वर्षीय बालकाचा चिखलात पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST2021-07-11T04:07:57+5:302021-07-11T04:07:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : घराच्या आवारात खेळत असलेला दीड वर्षीय बालक चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात घरासमाेर रिकाम्या भूखंडावरील पाण्याच्या ...

दीड वर्षीय बालकाचा चिखलात पडून मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : घराच्या आवारात खेळत असलेला दीड वर्षीय बालक चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात घरासमाेर रिकाम्या भूखंडावरील पाण्याच्या माेठ्या डबक्यात पडला. त्याच्या नाकाताेंडात गढूळ पाणी व चिखल गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना कामठी तालुक्यातील येरखेडा येथे शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
प्रियांश विशाल वयले (दीड वर्ष, रा. भूषणनगर, येरखेडा, ता. कामठी) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. प्रियांशचे वडील व काका शेजारी राहतात. ता. शुक्रवारी सायंकाळी त्याच्या काकाकडे आला हाेता आणि आजीसाेबत घराच्या आवारात खेळत हाेता. खेळताना त्याचा चेंडू घरासमाेरील रिकाम्या भूखंडारील पाण्याच्या माेठ्या डबक्यात गेला.
प्रियांश चेंडू आणण्यासाठी त्या डबक्याजवळ गेला आणि चेंडू काढताना ताेल गेल्याने डबक्यात पडला. सुरुवातीला हा प्रकार कुणाच्या लक्षात आला नाही. ही बाब लक्षात येताच आजीने त्याला डबक्यातून बाहेर काढले व स्वच्छ करून लगेच खासगी डाॅक्टरकडे नेले. डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. त्याच्या नाकाताेंडात गढूळ पाणी व चिखलाचा अंश गेल्याने त्याला गुदमरल्यागत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. या घटनेमुळे परिसरात शाेककळा पसरली हाेती.