थर्टी फर्स्टच्या रात्रीला देशी कट्टा, चाकू घेऊन मारहाण; दोघांना अटक, बजाजनगर पोलिसांची कारवाई
By दयानंद पाईकराव | Updated: January 1, 2024 14:44 IST2024-01-01T14:44:45+5:302024-01-01T14:44:54+5:30
थर्टी फर्स्टच्या रात्री देशी कट्टा आणि चाकु घेऊन भांडण करीत बजाजनगर येथील रेस्टॉरंटसमोर मारहाण करीत असलेल्या दोन आरोपींना शस्त्रासह अटक करण्यात आली आहे.

थर्टी फर्स्टच्या रात्रीला देशी कट्टा, चाकू घेऊन मारहाण; दोघांना अटक, बजाजनगर पोलिसांची कारवाई
नागपूर : थर्टी फर्स्टच्या रात्री देशी कट्टा आणि चाकु घेऊन भांडण करीत बजाजनगर येथील रेस्टॉरंटसमोर मारहाण करीत असलेल्या दोन आरोपींना शस्त्रासह अटक करण्यात आली आहे.
संजय फुलचंद परसगाये (वय २६, रा. नितनवरे ले आऊट, जयताळा) आणि लक्ष्मण घनशाम वर्मा (वय १९, रा. दंतेश्वरी झोपडपट्टी, बजाजनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बजाजनगर पोलिसांचे पथक थर्टी फर्स्टच्या रात्री १०.४५ वाजता परिसरात गस्त घालत असताना त्यांना धनगरपुरा येथील उत्तरायन रेस्टॉरंटसमोर काही व्यक्ती भांडण करून मारहाण करीत असताना दिसले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तेवढ्यात काही नागरिकांनी त्यांच्याजवळ शस्त्र असल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांची अंगझडती घेण्यात आली. अंगझडतीत आरोपी संजयजवळ देशी कट्टा तर लक्ष्मणजवळ एक लोखंडी चाकु आढळला. आरोपींना शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपींविरुद्ध कलम ३, ४, २५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बजाजनगर पोलिस करीत आहेत.