वृद्धाची हत्या

By Admin | Updated: January 17, 2016 02:46 IST2016-01-17T02:46:43+5:302016-01-17T02:46:43+5:30

जादूटोण्याचा संशय : कोलितमारा येथील घटना, आरोपीला अटक

Old assassination | वृद्धाची हत्या

वृद्धाची हत्या

पारशिवनी : जादूटोण्याच्या संशयावरून एका वृद्धावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याचा निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला पारशिवनी पोलिसांनी अटक केली. ही थरारक घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलितमारा येथे शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
कैलास रघुनाथ कोडवते (२८, रा. कोलितमारा, ता. पारशिवनी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ढालसिंग नंदलाल उर्माले (८५) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
कोलितमारा येथील ढालसिंग उर्माले हे आपल्या घरी झोपले होते. यावेळी त्यांची पत्नी रायवंतीदेखील शेजारच्या खाटेवर झोपलेली होती. दरम्यान, रात्री ११ वाजताच्या सुमारास आरोपी कैलास कोडवते याने उर्माले यांच्या घरी प्रवेश केला. अंधाराचा फायदा घेत ढालसिंग यांच्या डोक्यावर त्याने कुऱ्हाडीने वार केले. ढालसिंग यांच्या पत्नीला जाग येताच, आरोपी तेथून पसार झाला.
या घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पारशिवनीचे ठाणेदार कैलास तानकर, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. खोकले, जानराव बडवाईक, राजू रेवतकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी गावात नाकाबंदी करून आरोपीबाबत तपास सुरू केला. यात आरोपी कैलास कोडवते यास अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर कोलितमारा स्मशानभूमीत मृत ढालसिंग उर्माले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Old assassination