ओला, उबेर विरुद्ध आॅटोचालक
By Admin | Updated: September 1, 2016 03:02 IST2016-09-01T03:02:32+5:302016-09-01T03:02:32+5:30
शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबेर टॅक्सी तसेच ई-रिक्षावर पायबंद करण्याची मागणी करीत तीन सीटर आॅटोचालक संघटनांनी बुधवारी बंद पुकारला होता.

ओला, उबेर विरुद्ध आॅटोचालक
संपाचा फटका : नागपूरकर मात्र त्रस्त
नागपूर : शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबेर टॅक्सी तसेच ई-रिक्षावर पायबंद करण्याची मागणी करीत तीन सीटर आॅटोचालक संघटनांनी बुधवारी बंद पुकारला होता. हा बंद मुंबई व नागपूरसह राज्यातील इतर शहरातही पाळण्यात आला.
नागपुरात बंदला १०० टक्के यश मिळाल्याचा दावा आॅटोचालक संघटनांनी केला आहे. दरम्यान आॅटोचालकांच्या संपामुळे प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागले.
विशेषत: रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि इतर वाहनांची व्यवस्था नसलेल्या ठिकाणावरील प्रवाशांना ताटकळत बसावे लागल्याचे चित्र बुधवारी दिसले.
संविधान चौकात निदर्शने
नागपूर : शहरात धावणाऱ्या टॅक्सी कॅब, ई-रिक्षा, सहा सीटर आॅटो आणि टाटा मॅजिकच्या विरोधात तीन सीटर आॅटोचालकांमध्ये रोष दिसून येत आहे. परिवहन विभाग आणि सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आॅटोचालक संघटनांच्या महाराष्ट्र कृती समितीने बुधवारी संपूर्ण राज्यात आॅटोचालकांच्या संपाची घोषणा केली. विदर्भ आॅटोचालक फेडरेशनच्या माध्यमातून नागपुरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. या संपामध्ये शहरातील आॅटोचालकांच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. सकाळी ११ वाजता संविधान चौक येथे आॅटोचालक जमा झाले. याठिकाणी सभा घेण्यात आली. विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या सभेत फेडरेशनचे महासचिव आनंद चौरे, टायगर आॅटोरिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख, राष्ट्रवादी आॅटो युनियनचे अध्यक्ष अजय पाटील, आॅटोचालक स्कूल मंचचे रामराव वाकडे, आदर्श आॅटोरिक्षा चालक सेवासंघाचे अध्यक्ष राजेश पांडे, आजाद हिंद आॅटोरिक्षा संघटनेचे रफीक शेख, पँथर टॅक्सी आॅटोरिक्षा चालकमालक संघाचे अध्यक्ष महबूब अहमद, रेल्वे स्टेशन आॅटोचालक संघाचे अल्ताफ अंसारी व अलीम अंसारी यांच्यासह पदाधिकारी व तीन हजारच्या जवळपास आॅटोरिक्षा चालक सहभागी झाले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी भेट देत संपाचे समर्थन केले.
सभेदरम्यान विलास भालेकर यांनी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या परिवहन धोरणावर टीका केली. भालेकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष्य के ले. शहरात १४ हजार परवानाधारक आॅटोचालक आहेत. यांच्याकडून नियमाचे उल्लंघन झाल्यास थेट कारवाई करण्यात येते. मात्र मोबाईलच्या साहाय्याने चालणाऱ्या ओला व उबेरसारख्या कॅब शहरात बेकायदेशीर चालत असल्याचा आरोप त्यांनी केला. श्रीमंत उद्योजक व भांडवलदारांना फायदा पोहचविण्यासाठी या वाहनांना परवानगी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरात धावणाऱ्या ई-रिक्षा, सहासीटर आणि टाटा मॅजिक गाड्या अवैधरीतीने धावत असूनही वाहतूक विभागातर्फे कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी लावला.
या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे परवानाधारक आॅटोचालकांचा व्यवसाय बंद होत असल्याचे ते म्हणाले. सरकारने या प्रवासी वाहनांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन सोपविले. (प्रतिनिधी)
वर्दळीच्या ठिकाणचे प्रवासी खोळंबले
प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या सीताबर्डी, गांधीबाग, रेल्वेस्टेशन, इतवारी स्टेशन, अजनी स्टेशन, बसस्थानक, मोमीनपुरा क्षेत्र, फवारा चौक, बैद्यनाथ चौक, गोळीबार चौक, इंदोरा चौक, कमाल चौक, जिल्हाधिकारी क ार्यालय, न्यायालय, काटोल रोड, मानकापूर, गिट्टीखदान, रविनगर आदी भागातील रोजच्या प्रवाशांना स्टारबसची वाट पाहत खोळंबून राहावे लागले.
बसस्थानकावर ई-रिक्षाने दिलासा
मोठ्या बस स्थानकावरही प्रवाशांची काही प्रमाणात तारांबळ उडाली. मात्र या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात ई-रिक्षांची व्यवस्था असल्याने प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. शिवाय सहा सीटर वाहनांची वाहतूक येथून सुरू होती.
आॅटोचालकाने प्रवाशांना रस्त्यावर उतरविले
काही आॅटोचालक या बंदमध्ये सहभागी नव्हते. मात्र रस्त्यावर चालणाऱ्या अशा आॅटोचालकांना बंदमध्ये सहभागी चालकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. आनंद टॉकीज चौकात प्रवासी घेऊन जात असलेल्या एका आॅटोचालकावर इतरांनी हल्ला केला. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली व तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेवट संबंधित आॅटोचालकाने माफी मागत प्रवाशांना तेथेच उतरवून पळ काढला.
ओला, उबेर कॅबची काच फोडली
संपादरम्यान आॅटोचालकांनी ओला आणि उबेर टॅक्सी कॅबच्या काचा फोडल्याच्या घटना समोर आल्या. कॉटन मार्केटजवळ काहींनी एका उबेर टॅक्सीच्या काचा फोडल्या. दुसरीकडे वर्धमाननगर, भंडारा रोड भागात आॅटोचालकांनी अरेरावी करीत रस्त्यावर गोंधळ घातल्याची माहिती समोर आली. मात्र अशा उपद्रवींशी आॅटोचालक संघटनांचा संबंध नसल्याचे सांगत आमच्या बंदला बदनाम केले जात असल्याचे विदर्भ फेडरेशनचे आनंद चौरे म्हणाले.
आॅटोचालक संघटनांमध्ये दुफळी
आॅटोचालकांची संविधान चौकात सभा बोलाविण्यात आली होती. मात्र आॅटोचालक महासंघ नामक एका संघटनेतर्फे बुधवारी आरटीओ चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. ही संघटना अधिकृत नसल्याचे आनंद चौरे म्हणाले. येत्या २ सप्टेंबरला संघटित कामगारांचा देशव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या आंदोलनात आॅटोचालक संघटना सहभागी होणार नसल्याचे चौरे यांनी स्पष्ट केले.