अधिकारी रजेवर, गुन्हेगार कामावर !
By Admin | Updated: May 27, 2015 02:51 IST2015-05-27T02:51:25+5:302015-05-27T02:51:25+5:30
‘गुन्हेगारांच्या मोकाटीकरणा’मागचे कारण जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस दलातील अनेकांशी चर्चा केली असता अनेक मुद्दे पुढे आले.

अधिकारी रजेवर, गुन्हेगार कामावर !
गुन्हेगाराचा थयथयाट : सर्वसामान्य दहशतीत
नरेश डोंगरे नागपूर
पोलीस अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्याचे नाव घेतले जात नसतानाच अनेक ठाणेदारांसह वरिष्ठ पोलीस अधिकारीही सुट्यांवर गेल्यामुळे उपराजधानीत गुन्हेगारांनी थयथयाट सुरू केला आहे. खून, खुनाचे प्रयत्न, लुटमार, खंडणी वसुली, जबरी चोऱ्या, घरफोड्याच नव्हे तर बलात्कार, सामूहिक बलात्कार अन् विनयभंगांच्या घटनांनी या आठवड्यात सर्वसामान्यांसोबत पोलीसांमध्येही खळबळ उडवून दिली आहे.
गेल्या सात दिवसात अचानक गुन्हेगारी उफाळून आली आहे. खून, खुनाचे प्रयत्न, लुटमार, घरफोड्या, जबरी चोऱ्या, बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात अचानक वाढ झाली आहे. अवघ्या १७ तासात खुनाच्या तीन घटना घडल्या तर, आठ दिवसांच्या कालावधीत प्राणघातक हल्ल्याच्या १० घटना घडल्या. एकाच दिवशी कळमन्यात पेट्रोल पंपावर आणि प्रतापनगरात एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याकडे पिस्तुलाच्या धाकावर करण्यात आलेल्या लुटमारीसह एकूण १० लुटमारीच्या घटना घडल्या. प्रतापनगर आणि इमामवाड्यातील सामूहिक बलात्काराच्या दोन घटनांसह बलात्काराच्या एकूण सात घटना घडल्या. याच कालावधीत विनयभंगाच्या १० घटना पोलीस ठाण्यात नोंदल्या गेल्या. घरफोडी, चोरी, फसवणूक, खंडणी वसुलीचे गुन्हे वेगळेच आहे. उफाळलेल्या या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. दुसरीकडे शहरातील इमामवाडा, सदर, सक्करदरा, जरीपटकासह अनेक ठिकाणचे ठाणेदार, एसीपी आणि दोन डीसीपी, जॉर्इंट सीपी सुटीवर गेले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात बऱ्यापैकी अधिकारी, कर्मचारी, त्यांच्यासाठी आवश्यक साधन सुविधा उपलब्ध असताना गुन्हेगारीने उसळी मारण्याचे कारण काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
गुन्हेगारांकडे पोलिसांचे दुर्लक्ष
नागपूर : ‘गुन्हेगारांच्या मोकाटीकरणा’मागचे कारण जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस दलातील अनेकांशी चर्चा केली असता अनेक मुद्दे पुढे आले. पोलीस अधिकाऱ्यांची रजा, पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनास्था तसेच निष्क्रियता आणि बाहेरच्या गुन्हेगारांकडील दुर्लक्ष हे काही प्रमुख मुद्दे अधोरेखित झाले.
बाहेरच्यांवर दुर्लक्ष हवे !
उपराजधानीतील ४ लाख गुन्ह्यांचा डाटा शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आला असून, प्रत्येक गुन्हेगारावर नजर ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी पहिल्याच आठवड्यात सांगितले होते. मात्र, ३० लाख लोकसंख्येच्या उपराजधानीत रोजगाराच्या शोधात येणाऱ्यांपैकी किती जणांवर पोलिसांची नजर आहे, ते कळायला मार्ग नाही. बाहेरून येणारे अनेक जण व्यसनाधिनतेमुळे किंवा पैशाच्या लालसेपोटी गुन्हेगारीकडे वळतात. रोजगारांच्याच नव्हे तर शिक्षणाच्याही नावाखाली आलेलेही अनेक जण गुन्हेगारीत सक्रिय असल्याचे यापुर्वी उघड झालेले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर नजर रोखल्यास अनेक गुन्ह्यांचा उलगडा होऊ शकतो. शिवाय, पुढे घडू पाहणाऱ्या गुन्ह्यांनाही आळा घातला जाऊ शकतो.
पोलीस दलातही अस्वस्थता
उफाळलेल्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर वरिष्ठ पोलीस अधिकारीही अस्वस्थ आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात बऱ्यापैकी मनुष्यबळ, चांगली अन् पुरेशी वाहने तसेच सुविधा देऊनही गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात अपयश का येत आहे, त्याबाबत पोलीस दलात जोरदार मंथन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी सोमवारी सर्व ठाणेदारांचा क्लास घेतला.
मंगळवारी सकाळपासूनच पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांच्या दालनात दुपारपासून सायंकाळपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली तर, त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे अतिरिक्त आयुक्तांची प्रदीर्घ बैठक झाली. गुन्हे आणि पोलिसांची भूमिका यावर अधिकाऱ्यांनी चिंतन केले. (प्रतिनिधी)