कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात कमिशन खोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला ऊत आला आहे. खालच्या स्तरापासून लोकांनी पैसे दिल्याशिवाय एकही काम प्रशासनातील अधिकारी करत नाही. ज्या विभागाला काम दिली जाते तिथे सुद्धा कमिशन दिल्याशिवाय कामे, निधी वितरित केल्या जात नाही. हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर त्याची सुरुवात मंत्रालयातून करावी लागेल, असा आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सद्यस्थितीत सरकारची स्थिती गोंधळलेली आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघात जाऊन कायदा सुव्यवस्था आणि हिंदुत्व सांगतो. त्याला स्थानिक मंत्री आम्हाला कायदा व्यवस्था शिकवू नका, शांतता कशी राखायची आम्हाला ठाऊक आहे, असे बोलतात..त्यानंतर हे गृहमंत्री आमचे आहे असेही सांगतात. मंत्रीपदावर असलेले दोन नेत्यांमध्ये असा वाद होत असेल तर हे किती गोंधळलेलं सरकार आहे, हे स्पष्ट होते.
शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी कराशिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी झाली पाहिजे. एसआयटी नेमली पाहिजे. याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामध्ये जो संस्थाचालक दोषी आहेत, शिक्षक विभागाची यंत्रणा दोषी आहे त्याला कोणालाही सोडू नये. परंतु ज्यांनी घोटाळे केले त्यांना वाचवण्यासाठी निरपराध माणसाचा बळी घेऊ नका, असे वडेट्टीवार म्हणाले.
तर गृहमंत्र्यांच्या शहरात स्फोटक स्थिती तयार होईलपहेलगाममध्ये दोनशे किलोमीटर आत मध्ये अतिरेकी घुसून निरपराधी लोकांचा जीव घेतात. याची काहीच चर्चा होत नाही. दुर्दैवाने हिंदू-मुस्लीम ची चर्चा होते. सीमेवर इतके दुर्लक्ष असेल तर राज्यात आपण कोणाला बोलावे. नागपूर हे गृहमंत्र्यांचे शहर आहे. इथल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल भयंकर अशी स्थिती आहे. वेळीच बंधन घातले नाही तर नागपुरात स्फोटकासारखी स्थिती निर्माण होईल, असे सांगत वडेट्टीवार यांनी गृह विभागाला लक्ष्य केले.