समुपदेशन करण्यात अधिकारी कमी पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:46 IST2017-10-10T00:45:45+5:302017-10-10T00:46:04+5:30
फवारणी करताना शेतकºयांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी प्रकाराला अनेक बाबी कारणीभूत आहेत.

समुपदेशन करण्यात अधिकारी कमी पडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फवारणी करताना शेतकºयांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी प्रकाराला अनेक बाबी कारणीभूत आहेत. मात्र, या शेतकºयांचे समुपदेशन करण्यात, त्यांना योग्य प्रकारचा सल्ला देण्यात शासकीय यंत्रणेतील संबंधित अधिकारी कमी पडले, अशी कबुली केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर अहीर शेतकरी मृत्यू प्रकरणसंबंधाने पत्रकारांशी बोलले. ३२ शेतकºयांचा मृत्यू झाला. सरकार या प्रकरणाची पूर्ण चौकशी करीत आहे. काय कारण आहेत, कोण जबाबदार आहे, ते पाहून कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मृत शेतकºयाच्या परिवाराला दोन लाखांची आर्थिक मदत करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ज्याप्रमाणे वीज पडून कुणी ठार झाल्यास सरकार त्याच्या कुटुंबीयाला चार लाखांची आर्थिक मदत देते, त्याचप्रमाणे राज्याच्या दोन लाखांच्या मदतीत केंद्र सरकारदेखील दोन लाखांची भर घालून मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये मदत देण्याचा विचार करीत आहे. लवकरच त्या संबंधाने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ज्या औषधांनी त्यांचा मृत्यू झाला, तैवानचे जे फवारणी यंत्र वापरण्यात आले, त्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय किंवा कारवाई पूर्ण चौकशीनंतर राज्य सरकार घेईल, असेही ते म्हणाले.
रोहिंग्यांना नो एन्ट्री
यापूर्वी हे रोहिंगे भारतात शिरले आणि म्यान्मारमध्ये जी स्थिती निर्माण झाली, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. घुसखोरी केलेल्या रोहिंग्यांना भारतातून त्यांच्या देशात हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, यापुढे रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही, असेही अहीर यांनी स्पष्ट केले.