सीबीआयच्या सापळ्यात वेकोलिचा अधिकारी

By Admin | Updated: October 26, 2016 02:59 IST2016-10-26T02:59:02+5:302016-10-26T02:59:02+5:30

जखमी कामगाराच्या सुट्या अन् इतर लाभ मिळवून देण्यासाठी २२ हजारांची लाच मागणाऱ्या वेकोलितील एका अधिकाऱ्याला सीबीआयच्या पथकाने जेरबंद केले.

The officer in charge of the CBI | सीबीआयच्या सापळ्यात वेकोलिचा अधिकारी

सीबीआयच्या सापळ्यात वेकोलिचा अधिकारी

साडेबावीस हजारांची मागणी :
पाच हजारांची लाच घेताना सापडला

नागपूर : जखमी कामगाराच्या सुट्या अन् इतर लाभ मिळवून देण्यासाठी २२ हजारांची लाच मागणाऱ्या वेकोलितील एका अधिकाऱ्याला सीबीआयच्या पथकाने जेरबंद केले. संजय रॉय असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून, तो उमरेड क्षेत्रातील मोरपार खाणीत ‘अंडर आॅफिसर मायनिंग’ या पदावर कार्यरत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉय यांच्याकडे खाणीतील कामगाराची हजेरी, अनुपस्थिती, त्यावरील लाभ आणि भत्ते मंजूर करण्यासंबंधाचे अधिकार आहेत. दोन महिन्यांपूर्वी खाणीत झालेल्या अपघातात तक्रारदार व्यक्तीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो तेव्हापासून कामावर येऊ शकला नाही. त्याच्या हक्काच्या सर्व रजा संपल्या.
बिनपगारी रजाही संपल्या. त्यामुळे त्याला पुन्हा रजा देता येत नसल्याचे कळविण्यात आले होते. याशिवाय पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यातही अडचण निर्माण झाली होती. हे सर्व सुरळीत करून देण्यासाठी रॉय आपल्याला २२,५०० रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने सीबीआयकडे नोंदवली. त्या आधारे सीबीआयच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सापळा लावून लाचेचा पहिला पाच हजारांचा हप्ता स्वीकारताना रॉयला रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे वेकोलि वर्तुळात खळबळ उडाली. सूत्रांच्या माहितीनुसार, रॉयच्या निवासस्थानी झडती घेऊन सीबीआयच्या पथकाने एक लाख सात हजारांची रोकड जप्त केली. या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांकडे वारंवार संपर्क करूनही या प्रकरणाशी संबंधित माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The officer in charge of the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.