‘ऑड-इव्हन’ व्यवस्थेने गोंधळ वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST2021-04-18T04:07:12+5:302021-04-18T04:07:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गर्दी कमी करण्यासाठी मनपा आयुक्तांनी पाच झोनमध्ये अत्यावश्यक सेवांशी संबंधित वस्तूंची दुकाने ऑड-इव्हन पद्धतीने ...

‘ऑड-इव्हन’ व्यवस्थेने गोंधळ वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गर्दी कमी करण्यासाठी मनपा आयुक्तांनी पाच झोनमध्ये अत्यावश्यक सेवांशी संबंधित वस्तूंची दुकाने ऑड-इव्हन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश शुक्रवारी जारी केले. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होणार नसून, बाजारात केवळ गोंधळ उडणार आहे. एक दिवसाआड दुकाने सुरू राहणार असल्याने लोकांची अनावश्यक खरेदी वाढणार आहे. त्यामुळे गर्दी कमी होण्याऐवजी निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे आठवड्यात सलग तीन दिवस दुकाने सुरू ठेवण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे.
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांशी संबंधित दुकाने अर्थात मुख्यत्वे सर्व झोनमधील किराणा दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अफवांमुळे या दुकानात गर्दी होत आहे. खरी स्थिती पाहता, या दुकानालगतचे हार्डवेअरचे दुकान बंद आहे. त्यामुळे दुकानदारांमध्ये असंतोष पसरला आहे. वेळेच्या मर्यादेनुसार तीन दिवस अन्य तर तीन दिवस किराणा दुकाने सुरू ठेवावीत, अशी मागणी काही दुकानदार असोसिएशननी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नागपूर चिल्लर किराणा संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, मनपा आयुक्तांनी ऑड-इव्हन म्हणजे एक दिवसाआड दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सध्या अफवा वाढत आहेत. त्यामुळे लोक किराणा दुकानात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. अतिरिक्त साठा करण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. अशा स्थितीत दुकानात गर्दी वाढेल. आयुक्तांनी ही पद्धत न राबवता वेळेची मर्यादा आणून दुकाने सुरू ठेवावीत.
अन्य दुकानेही वेळेच्या मर्यादेत सुरू ठेवावीत
इतवारीतील स्टॉकिस्ट सुधीर मगनानी म्हणाले, लग्न आणि सणांचा सीझन पाहता, व्यापाऱ्यांनी सिझनेबल वस्तूंचा स्टॉक केला आहे. पण ३० तारखेपर्यंत लॉकडाऊन लावल्याने व्यापाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. लॉकडाऊन पुढे वाढल्यास वस्तूंचा खर्चही निघणे कठीण होणार आहे. लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानाचे भाडे, बँकांच्या कर्जाचे हप्ते आणि घरखर्च चालण्याची चिंता वाढली आहे. अत्यावश्यक सेवांशी संबंधित दुकानांप्रमाणेच अन्य दुकानेही ऑड-इव्हननुसार सकाळी १० ते ४ यावेळेत सुरू ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मदत होणार आहे.