ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला मारहाण
By Admin | Updated: February 3, 2015 00:57 IST2015-02-03T00:57:18+5:302015-02-03T00:57:18+5:30
खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीला दुखापत झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर दगडफेक केली. अधिकाऱ्याला मारहाण करून त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या.

ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला मारहाण
नागपूर : खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीला दुखापत झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर दगडफेक केली. अधिकाऱ्याला मारहाण करून त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. रविवारी दुपारी १ वाजता लालगंज परिसरात ही घटना घडली.
लालगंजमधील पाण्याच्या टाकीजवळ एनएमसीच्या कर्मचाऱ्यांनी पाईप लाईन टाकण्यासाठी एक खड्डा खोदून ठेवला. या खड्ड्यात रविवारी दुपारी एक व्यक्ती पडून गंभीर जखमी झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा रोष उफाळून आला. संतप्त नागरिकांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर दगडफेक केली. ही माहिती कळल्यामुळे राजेश वासुदेवराव ठक्कर (वय ४०, रा. गोपालकृष्ण नगर, वाठोडा) हे आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात पोहचले. त्यांना पाहून संतप्त नागरिकांनी त्यांच्या वाहनावरही दगडफेक केली. ठक्कर यांना मारहाण केली आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत कार्यालयात तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच लकडगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र, तत्पूर्वीच हल्ला करणारे पळून गेले. ठक्कर यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)