ओसीडब्ल्यूला पाजले पाणी
By Admin | Updated: May 21, 2014 01:10 IST2014-05-21T01:10:26+5:302014-05-21T01:10:26+5:30
२४ बाय ७ पाणीपुरवठा असलेल्या धरमपेठ झोनअंतर्गत नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ओसीडब्ल्यूने (आॅरेंज सिटी वॉटर) नागरिकांकडून

ओसीडब्ल्यूला पाजले पाणी
काँग्रेस- राष्ट्रवादी आक्रमक : महापौरांचे चौकशीचे आदेश
नागपूर : २४ बाय ७ पाणीपुरवठा असलेल्या धरमपेठ झोनअंतर्गत नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ओसीडब्ल्यूने (आॅरेंज सिटी वॉटर) नागरिकांकडून मोठी रक्कम वसूल केली आहे, असा आरोप करीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात ओसीडब्ल्यूलाच पाणी पाजले. राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रगती पाटील यांनी उचललेला हा मुद्दा विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, आभा पांडे आदींनी जोरात लावून धरला. प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेत महापौर अनिल सोले यांनी संबंधित प्रकरणाची आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे तसेच दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. महापौर सोले म्हणाले, करारानुसार जलवाहिनी असूनही पाणीपुरवठा होत नसलेल्या भागात पाणी देण्याची जबाबदारी ओसीडब्ल्यूची आहे. अशा भागात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पैसे घेतले जात असतील तर ते गंभीर आहे. यात दोषी असलेल्या अधिकार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रगती पाटील म्हणाल्या, सिव्हिल लाईन्समधील उत्कर्ष अलंकार अपार्टमेंटमध्ये १४ कुटुंब राहतात. त्यांच्याकडे तीन नळ कनेक्शन आहेत. मात्र, पाणी मिळत नाही. येथील एका महिलेने ओसीडब्ल्यूकडून टँकर मागविले तर त्यांच्याकडून महिनाभराचे २३ हजार रुपये वसूल करण्यात आले. धरमपेठ झोनमध्ये २४ तास पाणीपुरवठा होत नसल्याचा दावा त्यांनी केला. आभा पांडे म्हणाल्या, मस्कासाथ प्रभागातील पाणी समस्येबाबत ३० एप्रिल रोजी नागरिकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. आयुक्तांनी दोन दिवसांची वेळ मागितली होती. २१ दिवस गेल्यानंतरही समस्या सुटलेली नाही. ६० टक्के भागात कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत आहे. महापौर सोले यांनी दहा दिवसात या भागातील पाणी समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)