गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे कब्जा आंदोलन
By Admin | Updated: April 24, 2016 03:13 IST2016-04-24T03:13:43+5:302016-04-24T03:13:43+5:30
गोसेखुर्द प्रकल्प आणि कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी गोसेखुर्द गावातील शेतकऱ्यांनी २८ वर्षांपूर्वी जमिनी दिल्या होत्या.

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे कब्जा आंदोलन
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती : मागण्या पूर्ण करण्याची मागणी
नागपूर : गोसेखुर्द प्रकल्प आणि कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी गोसेखुर्द गावातील शेतकऱ्यांनी २८ वर्षांपूर्वी जमिनी दिल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना शासनाने अजूनही पुनर्वसन अनुदान मोबदला, २०१३ च्या पॅकेजचा लाभ दिलेला नाही. म्हणून गोसेखुर्द, गोसेबुजरुक गावच्या शेतकऱ्यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची खुली जागा व वसाहतीमधील खुल्या क्वार्टरचा ताबा घेण्यासाठी कब्जा आंदोलन २२ एप्रिलला गोसेखुर्द कर्मचारी वसाहतीत करण्यात आले.
२२ एप्रिल गोसेखुर्द प्रकल्पाचा भूमिपूजन दिन असतो. या वर्धापनदिनी प्रकल्पग्रस्तांनी गोसेखुर्द गावातून मोर्चा काढून कर्मचारी वसाहत व कार्यालयावर नेला. शासन आम्हाला मोबदला, पुनर्वसन, अनुदान पॅकेज देत नाही तर कर्मचारी वसाहतीमधील क्वार्टर व खुल्या जागा देण्यात यावा, ही मागणी घेऊन वसाहतीवर कब्जा करण्याच्या हेतूने शेकडो प्रकल्पग्रस्त मोर्चाने गेले. पवनी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेऊन अटक केली व सायंकाळी राजीव गांधी टेकडीवर सोडून दिले. १०० पेक्षा जास्त स्त्री-पुरुष प्रकल्पग्रस्तांना यावेळी अटक करण्यात आली होती. सायंकाळी ६ वाजता पुन्हा धरणावर नारे-निदर्शने करण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने नायब तहसीलदार कांबळे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व विलास भोंगाडे, समीक्षा गणवीर, रमेश भांडारकर, भीमराव भिमटे, सोमेश्वर भुरे, गुलाब मेश्राम, दादा आगरे यांनी केले. (प्रतिनिधी)