धान्य वाटपात पॉस मशीनचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:53+5:302021-03-13T04:13:53+5:30

नागपूर : प्रत्येक महिन्याच्या ६ ते ७ तारखेपासून रेशन दुकानातून धान्य वाटपाला सुरुवात होते. आज १२ तारीख झाल्यानंतरही दुकानदारांनी ...

Obstruction of POS machine in grain distribution | धान्य वाटपात पॉस मशीनचा अडथळा

धान्य वाटपात पॉस मशीनचा अडथळा

नागपूर : प्रत्येक महिन्याच्या ६ ते ७ तारखेपासून रेशन दुकानातून धान्य वाटपाला सुरुवात होते. आज १२ तारीख झाल्यानंतरही दुकानदारांनी धान्य वाटपाला सुरुवात केली नाही. यासाठी पॉस मशीन अडथळा ठरत असल्याने, रेशन दुकानदार हतबल आहेत. लॉकडाऊन तोंडावर असतानाही विभागाचेही त्याकडे दुर्लक्ष असल्याची तक्रार रेशन दुकानदार संघटनांनी केली आहे.

कार्डधारकांना रेशनचे वितरण पॉस मशीनच्या माध्यमातून करण्यात येते. रेशन दुकानात धान्याचा पुरवठा झाल्यानंतर दुकानातील धान्याच्या साठ्याची नोंद पॉस मशीनमध्ये करण्यात येते. जसजसे कार्डधारक रेशनचे धान्य घेऊन जातात, तसतसा पॉस मशीनमध्ये साठा कमी कमी होत असतो. परंतु या महिन्यात पॉस मशीनमध्ये धान्याच्या साठ्याची नोंदच करण्यात आली नाही. साठ्याची नोंदणी अन्न पुरवठा विभागाकडून करण्यात येते. विभागाकडून स्टॉक नोंदणी न झाल्यामुळे कार्डधारकांना धान्य देण्यास दुकानदारांना अडचणी येत आहे. त्यामुळे रेशन दुकानातून धान्याचे वितरण थांबले आहे. पालकमंत्र्यांनी १५ मार्चपासून लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे रेशनच्या दुकानात कार्डधारक रेशनसाठी येत आहेत. पण पॉस मशीनच्या या अडचणीमुळे रेशन दुकानदार धान्य देण्यास हतबल आहेत. विभागाने ताबडतोब ही प्रक्रिया न केल्यास लॉकडाऊनच्या काळात धान्य दुकानात गर्दी होईल आणि प्रशासनाने ज्यासाठी लॉकडाऊन केला, त्या उद्देशाला हरताळ फासला जाईल. त्यामुळे पॉस मशीनचा तांत्रिक घोळ लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी विदर्भ रास्तभाव दुकानदार केरोसिन विक्रेता संघटनेचे विदर्भ अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात शहराचे वितरण अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Obstruction of POS machine in grain distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.