त्या पुरावशेषांचे निरीक्षण करा
By Admin | Updated: November 13, 2015 03:01 IST2015-11-13T03:01:30+5:302015-11-13T03:01:30+5:30
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने मनसर उत्खननातील बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुरावशेष स्वत:च्या ताब्यात घेतले आहेत.

त्या पुरावशेषांचे निरीक्षण करा
हायकोर्ट : मनसरमधील पुरावशेष पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात
नागपूर : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने मनसर उत्खननातील बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुरावशेष स्वत:च्या ताब्यात घेतले आहेत. हे पुरावशेष दीर्घकाळापासून अवैधपणे बोधिसत्व नागार्जुन संस्थेच्या ताब्यात होते. सध्या हे पुरावशेष जुन्या हायकोर्ट इमारतीत ठेवण्यात आले आहेत. पुरावशेषांची योग्य काळजी घेण्यात येत आहे की नाही, हे पाहण्यासाठी याचिकाकर्ते व इतर प्रतिवादींना जुन्या हायकोर्ट इमारतीला भेट देण्याची उच्च न्यायालयाने मुभा दिली आहे.
पुरावशेषांचे संवर्धन व पुरावशेषांकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय बांधण्यासाठी विदर्भ जनकल्याण व विकास संस्थेने (वेद) जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलाने जुन्या हायकोर्ट इमारतीमध्ये पुरावशेष योग्य पद्धतीने ठेवण्यात आले नाहीत असा दावा केला होता तर, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वकिलाने पुरावशेष चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आल्याचे सांगितले होते. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने संबंधितांना जुन्या हायकोर्ट इमारतीला भेट देऊन निरीक्षण करण्याची मुभा दिली आहे. प्रकरणावर १९ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
मनसर उत्खनन स्थळ हे देशातील प्रमुख पुरातत्त्व स्थळांपैकी एक आहे. येथे १९२८ मध्ये पहिल्यांदा बौद्ध संस्कृतीचे पुरावशेष आढळून आले होते. यानंतर १९७२ मध्ये आढळलेले पुरावशेष नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी आणखी पुरावशेष असल्याचा विश्वास बाळगून बोधिसत्व नागार्जुन संस्थेने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून उत्खनन परवाना मिळविला होता. संस्थेने पुरावशेषतज्ज्ञ ए. के. शर्मा यांच्या निरीक्षणाखाली मनसर येथे उत्खनन केले. त्यात २७०० वर पुरावशेष मिळून आले.
हे पुरावशेष आतापर्यंत संस्थेच्या इमारतीत कुलूपबंद होते. कुलपाच्या चाव्या शर्मा यांच्याकडे होत्या. विशेष म्हणजे संस्थेच्या परवान्याची मुदत २००८ मध्येच संपली असून त्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. असे असतानाही संस्थेने पुरावशेष पुरातत्त्व विभागाच्या स्वाधीन न करता स्वत:च्याच ताब्यात ठेवले होते.
गेल्या ३० एप्रिल रोजी न्यायालयाने बोधिसत्व नागार्जुन संस्था व पुरावशेषतज्ज्ञ शर्मा यांना पुरावशेष स्वत:च्या ताब्यात ठेवण्याचा काहीच अधिकार नसल्याचे स्पष्ट करून पुरातत्त्व विभागाला तत्काळ पुरावशेषांचा ताबा घेण्याचे निर्देश दिले होते.(प्रतिनिधी)