ओबीसींनी झुगारली वैचारिक गुलामगिरी

By Admin | Updated: December 26, 2016 02:15 IST2016-12-26T02:15:36+5:302016-12-26T02:15:36+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून

OBC slumped conceptual slavery | ओबीसींनी झुगारली वैचारिक गुलामगिरी

ओबीसींनी झुगारली वैचारिक गुलामगिरी

पवित्र दीक्षाभूमीवर सोहळा : २२ प्रतिज्ञा ग्रहण करून हजारो ओबीसी बांधवांनी स्वीकारला बौद्ध धम्म
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या समाजाला मुक्त केले. त्यानंतर घडलेले ऐतिहासिक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक परिवर्तन जगाने अनुभवले. आज तब्बल ६० वर्षानंतर त्याच दीक्षाभूमीवर हजारो ओबीसी बांधवांनी जाहीरपणे वैचारिक गुलामगिरी झुगारत बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन पुन्हा एका नव्या परिवर्तनाला वाट मोकळी करून दिली. ते सुद्धा मनुस्मृती दहनाच्या दिवशी, हे विशेष.

आंबेडकरी समाजाची प्रगती ही धम्मामुळेच
आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे. माझे वडील ज्यांना सर्वच उपरे काका म्हणायचे, त्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले. त्यामुळेच जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा मला माझ्या भावना आवरता आल्या नाही. वडिलांच्या आठवणीने अश्रू निघाले. माझे वडील नेहमी म्हणायचे, आम्ही हिंदू म्हणून इतके वर्ष जगत आहोत. परंतु मंडल आयोग असो की इतर सुविधा, जेव्हा जेव्हा ओबीसी समाजाला काही सवलत मिळण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा सवर्ण हिंदू रस्त्यावर येतात. त्यामुळे ओबीसी समाजाच्या विकासात सवर्ण हिंदू हाच सर्वात मोठा अडथळा आहे. ओबीसी समाज मूळ नागवंशी म्हणजे बौद्धच होते. त्यामुळे आम्ही आज आमच्या मूळ धम्मात परत आलो आहोत. आंबेडकरी समाजाची प्रगती केवळ आरक्षणामुळे नव्हे तर धम्मामुळे झाली आहे.
- संदीप उपरे
अध्यक्ष, सत्यशोधक ओबीसी परिषद

आंबेडकरी समाजाकडून उत्स्फूर्त स्वागत
बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानिमित्त बौद्ध आंबेडकरी समाज बांधवानी धर्मांतरित ओबीसी बांधवांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांच्य स्वागतासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज बांधव दीक्षाभूमीवर आले होते. यावेळी विशेषत्वाने आंबेडकरी विचारवंत व दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले, पीरिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. भाऊ लोखंडे, रूपाताई कुलकर्णी, जेमिनी कडू, बीआरएसपीचे किशोर गजभिये, बार्टीचे राजेश ढाबरे, बसपाचे उत्तम शेवडे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांच्यासह त्रिरत्न बौद्ध महासंघ, शहरातील विविध बुद्ध विहार, आणि आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने बौद्ध भिक्खूंनीही धर्मांतरित ओबीसी बांधवांचे स्वागत केले.
इंग्लंडची इरिकाही धम्मदीक्षेने प्रभावित
इंग्लंड येथील रहणारी इरिका ही सध्या नागपुरात आली आहे. ती सामाजिक कार्यकर्ती असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघाशी ती जुळलेली असून धम्ममित्र म्हणून ती कार्य करते. ओबीसी समाज बांधव बौद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याचे जेव्हा तिला कळले तेव्हा ती स्वत:ला रोखू शकली नाही. ती सुद्ध दीक्षाभूमीवर आली आणि धम्मदीक्षेचा प्रत्येक क्षण तिने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

ओबीसी समाजाचे नेते दिवंगत हनुमंतराव उपरे यांनी १४ आॅक्टोबर २०११ रोजी ओबीसींच्या उन्नतीसाठी धर्मांतराशिवाय पर्याय नाही, अशी भूमिक मांडून पाच वर्षानंतर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या ६० व्या वर्षी मोठ्या संख्येने धर्मांतर करून बौद्ध धम्माचा स्वीकार करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या दिवसापासून त्यांनी इतर मागासवर्गीयांमधील विविध जातींमध्ये धर्मांतरासाठी जनजागृती घडवून आणण्याकरिता ‘चलो बुद्ध की ओर’ असे अभियान सुरू केले. परंतु गेल्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही चळवळ थोडी थंडावली होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे कुटुंबीय व सहकाऱ्यांनी या अभियानाला गती दिली, आणि उपरे काका यांचा संकल्प पूर्ण केला.
रविवारी दुपारी दीक्षाभूमीवर हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव दीक्षेसाठी एकत्र आले. तत्पूर्वी सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष संदीप हनुमंतराव उपरे, हनुमंतराव उपरे यांच्या पत्नी कमलताई, मुलगा संतोषसह उपरे कुटुंबीय ओबीसी बांधवांसह संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीने दीक्षाभूमीवर पोहोचले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव प्रमुख अतिथी होते. दुपारी ३ वाजता धम्मदीक्षेला सुरुवात झाली. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा दिल्या.
भदंत ससाई यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील आणि २२ प्रतिज्ञा ग्रहण करून हजारो ओबीसी बांधवांनी बौद्ध धम्म स्वीकारला. यावेळी सदानंद फुलझेले, संदीप उपरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हरिश्चंद्र सुखदेवे यांनी संचालन केले. प्रा. रमेश राठोड यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)


९२ वर्षीय आजी व १० वर्षाच्या नातवानेही घेतली दीक्षा
दीक्षाभूमीवर रविवारी पार पडलेल्या धर्मांतर सोहळ्यात ओबीसी समाजातील विविध जातीच्या हजारो बांधवांसोबतच मुस्लीम आणि बंजारा समजातील काही बांधवांनीही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यात बंजाराच्या समाजातील ९२ वर्षीय भिकरीबाई रामजी राठोड आणि त्यांचा १० वर्षाचा नातू यश राठोड यानेही दीक्षा घेतली. भिकरीबाई यांचा लहान मुलगा प्रा. रमेश राठोड यांनी यापूर्वीच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती परंतु आईने घेतली नव्हती. आज त्यांनी आपल्या मोठ्या मुलाच्या मुलासह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. याप्रसंगी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

भारत बौद्धमय होण्याच्या स्वप्नाची प्रचिती
भारत बौद्धमय करीन, असे बाबासाहेब म्हणाले होते. आज त्याची प्रचिती आली. ओबीसी समाज बांधवांनी इतक्या मोठ्या संख्येने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यावरून भारत बौद्धमय करण्याचे डॉ. बाबासहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास वाटतो.
- सदानंद फुलझेले
सचिव, दीक्षाभूमी स्मारक समिती


त्याच बुद्ध मूर्तीला शरण
१४ आॅक्टोबर १९५६ रोजी जो ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळा पार पडला त्या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या बुद्धमूर्तीपुढे हात जोडून शरण गेले होते तीच बुद्ध मूर्ती आजच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात आली होती. ही बुद्धमूर्ती शांतिवन चिचोली येतील डॉ. आंबेडकर वस्तू संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आली होती. तेथून ती विशेष विनंती करून बोलाविण्यात आली होती. याशिवाय भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात भदंत नागघोष, भदंत धम्मसारथी, भदंत नागवंश आणि भदंत धम्मबोधी यांचा धम्मदीक्षा देताना समावेश होता.

Web Title: OBC slumped conceptual slavery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.