नागपूर :नागपूरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला अखेर आज थांबवण्यात आले. पण आंदोलनाला मिळालेल्या एका भावनिक वळणाने सर्वांचे लक्ष वळले. आंदोलनाच्या वेळी एक चिमुरडी तिच्या भविष्यासाठी आंदोलनात तिच्या कुटुंबियांसोबत उपस्थित झाली. सहा दिवस चाललेल्या या आंदोलनाला अखेर मराठा आरक्षण थांबल्या नंतर थांबवण्यात आले.
मंत्री अतुल सावे यांनी आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधून सरकारच्या वतीने "ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू शकणार नाही" अशी स्पष्ट हमी दिली. त्यानंतर आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला
या आंदोलनाला एक भावनात्मक वळण मिळाले जेव्हा तीन महिन्यांची रमाई आपल्या आईसोबत आंदोलनस्थळी दिसली. पिवळ्या रंगाची मोठ्ठी टोपी डोक्यावर घेऊन रमाई आईच्या मांडीत खेळतांना उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
आई रुतिका मासमारे म्हणाल्या, “आमच्या पुढच्या पिढ्यांसाठीच हा लढा सुरू आहे. या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत." या लहान बाळामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक नवीन उत्साह पाहायला मिळाला.
या घटनेने आंदोलनाला एक मानवी आणि भावनिक रंग दिला, ज्यामुळे जनतेच्या मनात हा संघर्ष नुसता विचारांचा नव्हे, तर भावनांचा भाग बनला आहे. तीन महिन्यांच्या रमाईच्या मौन उपस्थितीमुळे आंदोलनाच्या उद्देशाला एक नवीन संवेदना प्राप्त झाली, ज्याने उपस्थितांची हृदयस्पर्शी प्रतिक्रिया मिळवली.