नायलाॅन मांजा विक्रेत्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:32+5:302021-01-16T04:11:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शासनाने नायलाॅन मांजाच्या विक्री व वापरावर बंदी घातली आहे. मात्र, या मांजाची खुलेआम विक्री ...

नायलाॅन मांजा विक्रेत्यास अटक
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शासनाने नायलाॅन मांजाच्या विक्री व वापरावर बंदी घातली आहे. मात्र, या मांजाची खुलेआम विक्री हाेत असून, मांजामुळे गळा कापला गेल्याने काहींवर मृत्यू ओढवला असून, काही जखमी झाले आहेत. असे असतानाही काही तरुण नायलाॅन मांजा वापरणे व काही दुकानदार त्याची विक्री करणे थांबवीत नाहीत. याच पार्श्वभूमीवर कामठी (जुनी) पाेलिसांनी शहरातील एका दुकानात गुरुवारी (दि. १४) सायंकाळी धाड टाकली आणि सहा हजार रुपयांचा नायलाॅन मांजा जप्त करीत दुकानदारास अटक केली.
मकरसंक्रांतीनिमित्त शहरातील काही दुकाने रंगीबेरंगी पतंग व मांजाने सजली आहेत. नायलाॅन मांजा प्राणघातक ठरत असल्याने शासनाने या मांजाचा वापर व विक्रीवर बंदी घातली आहे. त्यातच कामठी शहरातील बाॅम्बे स्टाेअर्समध्ये नायलाॅन मांजाची विक्री केली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. पाेलिसांनी बनावट ग्राहक दुकानात पाठवून खात्री पटवून घेतली आणि लगेच धाड टाकली. यात पाेलिसांनी चक्रीवर गुंडाळलेला ६ हजार १०० रुपये किमतीचा नायलाॅन मांजा जप्त केला.
याप्रकरणी दुकानदान सलिमउद्दीन बशिरउद्दीन शेख (४०, रा. जामा मस्जिदजवळ, कामठी) याच्याविरुद्ध भादंवि ३३६, १८८, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे सहकलम ५, १५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक युनूस शेख, उपनिरीक्षक एस. जी. पाटील, हेडकॉन्स्टेबल गयाप्रसाद वर्मा, प्रशांत सलाम, स्वाती चेटोळे यांच्या पथकाने केली.