नायलॉन मांजाची विक्री करणारे गजाआड
By Admin | Updated: January 13, 2017 02:07 IST2017-01-13T02:07:24+5:302017-01-13T02:07:24+5:30
रस्त्यावर दुकान मांडून घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांच्या प्रतापनगर आणि पाचपावली पोलिसांनी मुसक्या बांधल्या.
_ns.jpg)
नायलॉन मांजाची विक्री करणारे गजाआड
तीन आरोपी : प्रतापनगर आणि पाचपावली पोलिसांची कारवाई
नागपूर : रस्त्यावर दुकान मांडून घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांच्या प्रतापनगर आणि पाचपावली पोलिसांनी मुसक्या बांधल्या. या तिघांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असून पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मांजा जप्त केला आहे.
दुसऱ्याची पतंग कापण्यासाठी पतंगबाज घातक नायलॉन मांजाचा सर्रास वापर करतात. या मांजामुळे पतंगा तर कटतातच मात्र दरवर्षी अनेक निरपराधांचे बळीही जातात. कित्येक जण जखमी होतात. माणसांप्रमाणेच आकाशात उडणारे पक्षीही मांजाचे बळी ठरतात. मांजा घातक असल्यामुळे कोर्टाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीसुद्धा गल्लाभरू डोक्याचे व्यापारी या घातक मांजाची अनेक ठिकाणी सर्रास विक्री करताना दिसतात. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी अशाप्रकारे मांजा विकला जात असल्याची माहिती कळताच ठाणेदार शिवाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक ज्ञानेवर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जे. ए. गुरुनुले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खामल्यातील संजय प्रकाश गोलाणीच्या दुकानात धाड घातली. त्याच्याकडून १२ चकऱ्या मांजा जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
गुरुवारी अशाच प्रकारे पाचपावलीतील बाळाभाऊ पेठेत नायलॉन मांजा विकणारे निखील (वय २१) आणि त्याचा भाऊ सनी रामदास उमरेडकर (वय २१) यांच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या.
त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा आणि तो गुंडाळण्यासाठी वापरली जाणारी मशिन असा एकूण सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली. मंगळवारी सायंकाळी अशाच प्रकारे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपी मोहम्मद शफी शेख अब्बास (वय ४०) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. (प्रतिनिधी)
धडक
कारवाईची गरज
संक्रातीच्या सणाच्या निमित्ताने पतंगबाजीला सर्वत्र उधाण आले आहे. पतंग आणि मांजाचीही मागणी वाढली आहे. अनेक पतंग विक्रेते अजूनही सर्रास घातक मांजाची विक्री करताना दिसतात. प्रत्येकच पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी मांजा विक्री केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाईच्या नावाखाली एकट दुकट कारवाई करण्याऐवजी धडक कारवाईची मोहीम राबवावी. त्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. अनेकांना दुखापत होण्यापासूनही बचाव होऊ शकतो.