रेमडेसिविरच्या काळाबाजारात प्रियकरासह नर्स गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST2021-04-20T04:07:59+5:302021-04-20T04:07:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पोलिसांच्या कठोर भूमिकेनंतरही रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच आहे. कोविड सेंटरमधून एका रुग्णाचे रेमडेसिविर इंजेक्शन ...

रेमडेसिविरच्या काळाबाजारात प्रियकरासह नर्स गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांच्या कठोर भूमिकेनंतरही रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच आहे. कोविड सेंटरमधून एका रुग्णाचे रेमडेसिविर इंजेक्शन चोरून प्रियकराच्या मदतीने त्याचा काळाबाजार करणाऱ्या नर्सला (परिचारिका) वाठोडा पोलिसांनी पकडले. ज्योती अजित (२), रा. जामठा आणि शुभम सत्यनिवास अजुर्नवार (२४), रा. नागेश्वरनगर, पारडी अशी आरोपीची नावे आहेत.
ज्योती जामठा येथील गायकवाड पाटील परिसरात बनवण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये नर्स आहे. ती मूळची सिवनी येथील रहिवासी आहे. भोपाळ येथून नर्सिंग कोर्स केल्यानंतर ती नागपूरला आली. तिचे शुभमसोबत प्रेमसंबंध आहेत. शुभम बांधकाम ठेकेदार आहे. कोविड सेंटरमध्ये नर्स असल्याने ज्योतीला सध्या रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्ण कुठलीही किंमत मोजायला तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे तीही इंजेक्शनचा काळाबाजार करू लागली. तिने शुभमलाही आपल्या योजनेत सामील केले. मागील काही दिवसांपासून शुभम रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करू लागला. वाठोडा पोलिसांनी याची माहिती मिळाली. शुभम बाईकवर स्वार होऊन वाठोडा स्मशानभूमीतूनच रेमडेसिविर इंजेक्शन विकत होता. पोलिसांनी त्याला रोखले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पाच रेमडेसिविर इंजेक्शन सापडले. याबाबत त्याला विचारले असता शुभमने सांगितले की, त्याला जामठ्याजवळ एका बाइकस्वारने रेमडेसिविर विकण्यास दिले; परंतु कोणत्या बाइकस्वारने दिले याबाबत मात्र तो समाधानकारक उत्तर देत नव्हता. नंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच शुभमने ज्योतीचे नाव सांगितले. सोमवारी सकाळी ज्योतीलाही ताब्यात घेतले. तिने कोरोना संसर्गित रुग्णाच्या मेडिसिन किटमधून रेमडेसिविर इंजेक्शन चोरल्याचे कबूल केले. दोघांनाही दोन दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले. ‘लोकमत’ने १४ एप्रिलच्या अंकात रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. तेव्हापासून ही कारवाई केली जात आहे. ही कारवाई डीसीपी डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात पीआय आशालता खापरे, पीएसआय रमेश नन्नावरे, एएसआय बट्टूलाल पांडे, शिपाई जगन्नाथ घायवट, रोहिदास जाधव, अतुल टिकले, पवन साखरकर आणि चालक गजेश यांनी केली.
तीन दिवसांत ४० रेमडेसिविर जप्त
गेल्या तीन दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराचे चार रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहेत. यात १४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून ४० इंजेक्शन जप्त करण्यात आले. यात ९ वॉर्ड बॉय आणि एक नर्सचा समावेश आहे. तसेच एक डॉक्टर, दोन मेडिसिन स्टोअरचे कर्मचारी आणि फार्म डिस्ट्रीब्युटर व कथित पत्रकाराचाही समावेश आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यात पोलीस सक्रिय असल्याचे दिसून येते; परंतु एफडीए मात्र यासंदर्भात पूर्णपणे उदासीन दिसून येत आहे.