अवैध ले-आऊटवर नासुप्रचा दणका
By Admin | Updated: February 22, 2015 02:36 IST2015-02-22T02:36:54+5:302015-02-22T02:36:54+5:30
नासुप्रची कुठलीही मंजुरी न घेता मेट्रोरिजनच्या नावावर अवैधरीत्या ले-आऊट टाकून भूखंड विक्री करणाऱ्यांना नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी जोरदार दणका दिला आहे.

अवैध ले-आऊटवर नासुप्रचा दणका
नागपूर : नासुप्रची कुठलीही मंजुरी न घेता मेट्रोरिजनच्या नावावर अवैधरीत्या ले-आऊट टाकून भूखंड विक्री करणाऱ्यांना नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी जोरदार दणका दिला आहे. न्यू प्रॉस्परिटी लॅण्ड डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्सने मौजा जामठा परिसरातील खसरा क्रमांक २७/१ वर टाकलेल्या अवैध ले-आऊटवर नासुप्रने शुक्रवारी कारवाई केली. डेव्हलपर्सने मार्किंग करून गाडलेले खांब जेसीबीच्या साहाय्याने उखडून फेकण्यात आले. याशिवाय डेव्हलपर्सला ताकीदही देण्यात आली आहे.
मेट्रोरिजनच्या नावावर अनधिकृत ले-आऊटमधील भूखंड विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू असल्याचा खुलासा लोकमतने ‘मेट्रोरिजनचे गोलमाल’ या वृत्तमालिकेंतर्गत केला. मेट्रोरिजनच्या नावावर नासुप्रची परवानगी न घेता, डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट न करता ले-आऊट टाकून मोठ्या प्रमाणात भूखंडांची विक्री केली जात आहे. नागरिकांना मेट्रोरिजनचे स्वप्न दाखवून भविष्यातील फायद्यासाठी भूखंड खरेदी करण्याचे प्रलोभन दिले जात असून या प्रलोभनाला बळी पडून नागरिक अनधिकृत भूखंड खरेदी करीत आहे. ही वास्तविकता लोकमतने मांडली व नागरिकांनी मेट्रोरिजनमधील भूखंड खरेदी करण्यापूर्वी कोणकोणती कागदपत्रे पहावी, याबाबत मार्गदर्शनही केले. लोकमतच्या या वृत्तमालेची नागरिकांनी तर दखल घेतलीच पण नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनीही गंभीर दखल घेतली व अशा अनधिकृत ले-आऊटवर कारवाई करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना दिले.
लोकमतच्या वृत्तानंतर नागपूर ग्रामीण तहसील परिसरात मौजा जामठा अंतर्गत खसरा क्रमांक २७/१ वर न्यू प्रॉस्परिटी लॅण्ड डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्सने अनधिकृत ले-आऊट टाकल्याची तक्रार नासुप्रकडे आली. डेव्हलपर्सने सुमारे तीन एकरवर अनधिकृत ले-आऊट टाकले असून प्लॉटचे मार्किंग करून खांबही गाडले होते. ले-आऊटची माहिती देणारे फलकही लावले होते. संबंधित जमीन पूर्वी मिहानमध्ये नोटिफाईड होती. आता ती डीनोटिफाईड झाली आहे. या तक्रारीची दखल घेत विभागीय अधिकारी पंकज पाटील यांनी संबंधित डेव्हलपर्सच्या नावे कारणे दाखवा नोटीस बजावली व काम थांबविण्याचे निर्देश दिले. डेव्हलहपर्सचे व्यवस्थापकीय संचालक घनश्याम नंदनवार व पडोळे हे आहेत. नोटिसीनंतरही काम थांबविण्यात आले नाही. त्यामुळे शुक्रवारी नासुप्रच्या पथकाने कारवाई केली. जेसीबीच्या साहाय्याने सर्व खांब हटविण्यात आले. लावलेले फ्लेक्स जप्त केले. कारवाईचा धसका घेत डेव्हलपर्सने नासुप्रकडे परवानगीसाठी रीतसर अर्ज करण्याची हमी दिली आहे. (प्रतिनिधी)
अवैध ले-आऊट विक्रेत्यांचे धाबे दणाणले
नासुप्रची परवानगी न घेता अवैधरीत्या ले-आऊट टाकून नागरिकांना भूखंड विकले जात असल्याचा खुलासा लोकमतने ‘मेट्रोरिजनचे गोलमाल’ या वृत्तमालिकेंतर्गत केला. यामुळे नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली असून नागरिक डेव्हलपर्स न नासुप्रकडे चौकशी करू लागले आहेत. नासुप्रनेही दखल घेत पहिलीच धडाकेबाज कारवाई केल्यामुळे अवैध ले-आऊट टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.