उपराजधानीतील असंख्य विद्यार्थी ‘पबजी’च्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 10:27 AM2019-12-02T10:27:24+5:302019-12-02T10:30:10+5:30

पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, उपराजधानीत गेल्या दोन महिन्यात तीन विद्यार्थ्यांनी पबजीच्या नादात आत्मघात करून आपला जीव गमावला आहे.

Numerous students from the Nagpur s are trapped by 'Pubji' game | उपराजधानीतील असंख्य विद्यार्थी ‘पबजी’च्या आहारी

उपराजधानीतील असंख्य विद्यार्थी ‘पबजी’च्या आहारी

googlenewsNext
ठळक मुद्देपालकांच्या काळजाची वाढली धडधडमोबाईलच्या स्क्रीनवरून थेट मेंदूचा ताबाकुणी सोडत आहे घर, कुणी करतोय आत्मघातभविष्याचा होतोय खेळखंडोबा

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईलच्या स्क्रीनवरून थेट मेंदूचा ताबा घेणाऱ्या ‘पबजी’ने अनेकांच्या भविष्याचा खेळखंडोबा चालविला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, उपराजधानीत गेल्या दोन महिन्यात तीन विद्यार्थ्यांनी पबजीच्या नादात आत्मघात करून आपला जीव गमावला आहे. शनिवारी एका विद्यार्थ्याने चक्क घर सोडले. त्याच्या मित्राने त्याला आपल्याकडे थांबवून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. अवघ्या सोळाव्या वर्षी विद्यार्थ्याने घर सोडण्याच्या घटनेमागचे मूळ कारण पुढे आल्याने पबजी पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. दुसरीकडे नैराश्याच्या गर्तेत ढकलून आत्मघातास प्रवृत्त करणाºया या भयावह खेळाने पालकांच्या काळजाची धडधड वाढविली आहे.
सहा-आठ महिन्यांपूर्वी ब्ल्यू व्हेलने पालकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती. ब्ल्यू व्हेलच्या नादी लागलेल्या देश-विदेशातील अनेक जणांनी आत्महत्या केली होती. ब्ल्यू व्हेलवर त्यावेळी बंदी घालण्याची जोरदार मागणी पुढे आली होती. आता ब्ल्यू व्हेल थंडावल्यासारखा झाला अन् आता पबजीने हैदोस घालणे सुरू केले आहे. पबजीच्या नादी लागलेल्या अनेकांनी आपला जीव गमावला आहे. आत्मघात करणारे झटक्यात निघून जातात. मात्र, त्यांच्या पालकांच्या हृदयात झालेली जखम त्यांना आयुष्यभर वेदना देणारी ठरते. त्यामुळे पालकांनीच आपल्या पाल्यांवर आणि त्यांच्या मोबाईलवर सूक्ष्म नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
सक्करदरा भागात राहणाºया या विद्यार्थ्याचे वय जेमतेम १६ वर्षे असून, तो दहावीचा विद्यार्थी आहे. त्याचे आई आणि वडील दोघेही विद्यार्थी घडवितात. बहीण शिक्षणासाठी विदेशात गेली आहे. हा मात्र मोबाईलच्या माध्यमातून पबजीच्या नादी लागला. त्याला पबजीचा असा काही नाद जडला की तो शाळा, शिकवणी अभ्यास साऱ्यांनाच दप्तरात गुंडाळून ठेवत आहे. तो वर्गाला दांडी मारत असल्याचे कळाल्याने वडिलांनी त्याला समज दिली. त्याला मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचा त्याला एवढा राग आला की तो तडक आपले घर सोडून निघाला. त्याची सैरभैर अवस्था रस्त्यात भेटलेल्या मित्राच्या लक्षात आली. त्याने त्याला रोखले. आपल्या घरी नेले. धोका लक्षात घेत त्याला सोबत ठेवले अन् भल्या सकाळी त्याच्या कुटुंबीयांना निरोप देत त्याला सुखरूप पोहचवूनही दिले. त्याची अवस्था अजूनही सैरभैरच आहे. मात्र, तो घरून गेल्यापासून तो घरी पोहचेपर्यंतचे १४-१६ तास त्याच्या आईवडिलांची ही अवस्था झाली होती, ते त्यांचे त्यांनाच माहीत आहे. या १४ तासात आपल्या काळजाचा तुकडा कुठे गेला, कुठे असेल, काय करीत असेल, या विचारांसह अनेक शंकाकुशंकांनी या मायबापांनी जे भोगले असेल, ते त्यांचे त्यांनाच कळावे. हा एकटाच नाही, असे अनेक विद्यार्थी पबजीमुळे आपल्या परिपाठाकडेच नव्हे तर भविष्याकडेही पाठ फिरवून बसले आहेत. त्यांना फक्त आणि फक्त मोबाईल अन् पबजीच हवा आहे.
एक प्रकारचे व्यसनच त्यांना जडले आहे. त्याच्यात कुणी आडकाठी आणली तर ते स्वत:ला संपवून घेत आहेत. या एकूणच प्रकारामुळे पालकांच्या काळजाची धडधड वाढली आहे.

दोन अडीच महिन्यांतील घटना
२६ सप्टेंबरला पारडीतील कोमलने गळफास लावून आत्महत्या केली होती. कोमल पॉलिटेक्निची विद्यार्थिनी होती. तिच्या हातात मोबाईल आला अन् तिला पबजीची सवय लागली. परिणामी तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ती अनुत्तीर्ण झाली. त्यातून तिला नैराश्य आले अन् तिने आत्मघात करून घेतला. महिनाभरापूर्वी अजनीतील विद्यार्थ्याचेही असेच झाले. उच्चशिक्षित अन् सुसंस्कृत घराण्यातील या विद्यार्थ्याने आधी हातावर चिरे मारले. नंतर एका इमारतीवर चढला अन् तेथून त्याने उडी मारून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईलच्या नादी लागलेल्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या करून घेतली. प्रतापनगरातही गेल्या महिन्यात पबजीच्या नादी लागलेल्या एकाने आत्महत्या केल्याची ओरड होती. मात्र, ती रेकॉर्डवर आली नाही.

Web Title: Numerous students from the Nagpur s are trapped by 'Pubji' game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.