तीन महिन्यानंतर ५००च्या आत रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:17+5:302021-05-25T04:08:17+5:30
नागपूर : कोरोना रुग्णसंख्येचा वाढता ग्राफ तीन महिन्यानंतर खाली आला आहे. सोमवारी पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याची रुग्णसंख्या ५००च्या आत आली. ...

तीन महिन्यानंतर ५००च्या आत रुग्णसंख्या
नागपूर : कोरोना रुग्णसंख्येचा वाढता ग्राफ तीन महिन्यानंतर खाली आला आहे. सोमवारी पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याची रुग्णसंख्या ५००च्या आत आली. ४८२ रुग्ण व २९ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, आज शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील रुग्ण व मृत्यूची संख्या कमी होती. शहरात २४६ रुग्ण व १२ मृत्यू, तर ग्रामीणमध्ये २२७ रुग्ण व ८ मृत्यू झाले. परंतु चाचण्या कमी झाल्याने त्याचा हा प्रभाव तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
कोरोना नियंत्रणात येत असल्याने वैद्यकीय क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांचे वॉर्ड पुन्हा रिकामे होऊ लागले आहेत. नागपूर जिल्ह्यात फेब्रुवारीच्या १५ तारखेपासूनच रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली होती. या दिवशी ४९८ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. मार्च व एप्रिल महिन्यात जुन्या रुग्णसंख्येचे विक्रम मोडीत निघाले. विशेषत: एप्रिल महिन्यात आठ हजाराच्या घरात रुग्णसंख्या गेली. रुग्णसेवा विस्कळीत होण्याच्या स्थितीत असताना मे महिन्यात कोरोनाचा आलेख झपाट्याने खाली आला. यामुळे मोठे संकट टळले. तिसऱ्या लाटेत ही स्थिती निर्माण होऊ नये म्हणून आतापासून नियोजन करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
-रुग्णबरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर
दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत चार पटीने आज रुग्ण बरे झाले. २००३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५. ५१ टक्क्यांवर आले आहे. याशिवाय, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन १२,३८४ झाली आहे. सध्या ८,७६० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, तर ३,६२४ रुग्ण शासकीय, खासगी रुग्णालयांसह कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत.
-कमी चाचण्यांचा धोका
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवून बाधितांना उपचाराखाली आणणे आवश्यक असते. परंतु नागपूर जिल्ह्यात दर रविवारी चाचण्या कमी होत असल्याचे चित्र आहे. २३ तारखेलाही चाचण्या कमी झाल्या आहेत. एकूण १३,१२९ चाचण्यांमध्ये ११,०९८ शहरात, तर केवळ २,०३१ चाचण्या ग्रामीणमध्ये झाल्या आहेत. परिणामी, रुग्णही कमी आढळून आल्याची शंका आहे. कमी चाचण्यांमुळे धोका वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
:: कोरोनाची सोमवारची स्थिती
दैनिक चाचण्या: १३,१२९
शहर : २४६ रुग्ण व १२ मृत्यू
ग्रामीण : २२७ रुग्ण व ८ मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७१,५४१
ए. सक्रिय रुग्ण : १२,३८४
ए. बरे झालेले रुग्ण : ४,५०,३६०
ए. मृत्यू : ८,७९७