नव्या वर्षात विमानांचे उड्डाण वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST2021-01-02T04:07:33+5:302021-01-02T04:07:33+5:30
वसीम कुरेशी नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्या वर्षात विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. एप्रिल २०२० ...

नव्या वर्षात विमानांचे उड्डाण वाढण्याची शक्यता
वसीम कुरेशी
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्या वर्षात विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. एप्रिल २०२० मध्ये संचालन बंद करणाऱ्या जेट एअरवेजकडून पुन्हा विमानांचे संचालन एप्रिल महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय नुकतीच तयार झालेली एक नवी एअरलाईन्स क्षेत्रीय संपर्क योजनेंतर्गत (आरसीएस) नागपूरवरून इंदूर आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. आयटी कंपन्यांचे कर्मचारी अद्यापही वर्क फ्रॉम होम करीत असल्यामुळे काॅर्पोरेट ट्रॅव्हलिंग सुरू झालेली नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सुरू झालेल्या अनलॉकच्या सुरुवातीपासून आतापर्यंत नागपूर विमानतळावरून जवळपास ८० टक्क्यांपेक्षा अधिक विमानांचे संचालन सुरू झाले आहे. परंतु आतापर्यंत कतार व शारजाहसाठी आंतरराष्ट्रीय विमान सुरू होऊ शकले नाही. डोमॅस्टिक ऑपरेशन्समध्ये इंडिगो एअरलाईन्सची कोच्ची, भुवनेश्वर विमानसेवा सुरू झालेली नाही. एअर इंडियाचे एक दिल्लीला जाणारे विमान आठवड्यातून तीन दिवस सुरू आहे.
हे विमान दररोज चालविण्याचा प्रस्ताव मुख्यालयात प्रलंबित आहे. सूत्रांनुसार जेट एअरवेजने नागपूर विमानतळावर स्लॉटसह इतर सुविधांबाबत प्रस्ताव दिला आहे. मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) त्यास सर्व आवश्यक सुविधा व स्लॉट देण्यासाठी तयार आहे. उल्लेखनीय म्हणजे जेटची मुंबई, दिल्लीशिवाय एटीआर विमानाच्या माध्यमातून नागपूर ते अलाहाबादसाठी विमान संचालित होत होते. जर जेट आल्यास त्यासोबत अलाहाबादसाठी पुन्हा विमान मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या दिल्ली, मुंबई, पुणे, गोवा, इंदूर, जयपूर, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई व कोलकातासाठी विमाने सुरू आहेत.
...........
वाढत आहे प्रवाशांची संख्या
लॉकडाऊनपूर्वी नागपूर विमानतळावरून दररोज ४ हजार प्रवासी प्रवास करीत होते तर ४ हजार प्रवासी विमानतळावर दाखल होत होते. सध्या ही आकडेवारी ३ हजार प्रवाशांपर्यंत पोहोचत आहे. मार्च अखेरपर्यंत दररोज प्रवाशांची संख्या ४ हजारावर जाण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
..............