कोरोनाची रुग्णसंख्या तातडीने कमी व्हावी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:08 IST2021-02-11T04:08:46+5:302021-02-11T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कोरोनाची संख्या अजूनही वाढत आहे. शासनाने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. स्वत: ...

कोरोनाची रुग्णसंख्या तातडीने कमी व्हावी ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोनाची संख्या अजूनही वाढत आहे. शासनाने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे यासंदर्भात सूचना केल्या होत्या. आज स्वत: मुख्यमंत्र्यांचे कोरोनाविषयक सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नागपुरात यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेत आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये तातडीने रुग्णसंख्या कमी झाली पाहिजे, असे निर्देश देत चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या आणि या आजाराबाबतच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच कोविड लसीकरणाबाबत उच्चस्तरीय बैठक बचत भवन येथे घेण्यात आली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, डॉ. देव, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंग, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकर तसेच जिल्हा टास्क फोर्सचे मेंबर्स डॉ. मिलिंद भुरसुंडी, डॉ. रवींद्र सरनाईक, डॉ. पाटील, डॉ. अविनाश गावंडे आदी उपस्थित होते.
शाळांमध्ये कोविडसंदर्भातील आरोग्य यंत्रणेने दिलेले सर्व सुरक्षा नियम, अटी पाळण्यात येत आहे की नाही, याबाबत विशेष लक्ष पुरवावे.
खासगी रुग्णालयामध्ये कोविडबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऐनवेळी नकार देण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर महापालिकेने नियंत्रण आणावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
बॉक्स
पोस्ट कोविड सेंटर अधिक सक्षम करा
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या रुग्णांच्या शारीरिक व मानसिक समस्यांचे निराकरण करून त्यांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार तात्काळ मिळावेत, यासाठी पोस्ट कोविड सेंटर अधिक सक्षम करावे, अशी सूचनाही म्हैसेकर यांनी केली.
यासोबतच कोविड लसीकरणाबाबत लाभार्थ्यांमध्ये काही प्रमाणात उदासीनता दिसत आहे. त्यामुळे लसीची निर्मिती, त्याचा उपयोग, त्यामुळे शरीरावर होणारा परिणाम याबाबत लाभार्थ्यांना लसीकरणाच्या वेळी आगाऊ माहिती देण्यात यावी. लसीकरण झाल्यानंतर शरीरामध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्यास वेळ लागतो. म्हणून ती विकसित होईपर्यंत त्या व्यक्तीस कोविडची बाधा होऊ शकते. यामुळे लसीकरण झाल्यानंतरही कोविड मार्गदर्शिकेचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.