न्युक्लिअर मेडिसीनला ‘बूस्टर’ डोसची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST2021-05-24T04:08:29+5:302021-05-24T04:08:29+5:30
नागपूर : ‘न्युक्लिअर मेडिसीन’मुळे एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला, हे ओळखण्यासाठी खूपच महत्त्वाची उपचारपद्धती आहे. मेडिकलमध्ये या ...

न्युक्लिअर मेडिसीनला ‘बूस्टर’ डोसची गरज
नागपूर : ‘न्युक्लिअर मेडिसीन’मुळे एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला, हे ओळखण्यासाठी खूपच महत्त्वाची उपचारपद्धती आहे. मेडिकलमध्ये या विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली. या विभागामुळे कर्करोगाच्या निदानासोबतच एन्डोक्रिनोलॉजी, थायराईड, मूत्रपिंड प्रत्यारोपण, न्यूरोलॉजी व हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांसाठी हा विभाग वरदान ठरणार होता. परंतु आता तीन वर्षांचा कार्यकाळ होऊनही या विभागाच्या संदर्भात सर्व हालचाली थंडबस्त्यात पडल्या आहेत. कोरोनामुळे जुन्या आजारांची गुंतागुंत वाढत असल्याने त्याच्या योग्य निदानासाठी ‘न्युक्लिअर मेडिसीन’ला ‘बूस्टर’ डोसची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्यावरील उपचाराचा यशाचा दर वाढतो. शिवाय उपचाराचा खर्च कमी होतो. परंतु शासकीय रुग्णालयात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांना याचे निदान करण्यासाठी खासगीचा रस्ता धरावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मेडिकल प्रशासनाने ‘न्युक्लिअर थेरपी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही उपचारपद्धती एक्स-रे व सिटीस्कॅन यांच्या निदान उपचारपद्धतीपेक्षा वेगळी आहे. यात ‘गॅमा कॅमेरा’च्या माध्यमातून कर्करोग आहे किंवा नाही, कर्करोग झाला असल्यास देत असलेल्या उपचाराला किती प्रतिसाद मिळतो आहे, नेमक्या किती पेशी बाधित आहेत, याचे सूक्ष्म निरीक्षण या ‘न्युक्लिअर मेडिसीन’ मध्ये होते. तसेच हृदयरोग, एन्डोक्रिनोलॉजी, थायराईड, मूत्रपिंड प्रत्यारोपण, न्यूरोलॉजीसंदर्भात आहे. या नव्या विभागासाठी २०१७-१८ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली. नंतर हा प्रस्ताव शासकीय मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला, परंतु नंतर या प्रस्तावाचा पाठपुरावाच करण्यात आला नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
-हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ठरणार होते वरदान
कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत हृदयविकाराच्या धक्क्यानंतर हृदयाच्या स्नायूंची स्थिती कशी आहे, किती स्नायू मृत झाले आहेत याचा अचूक अंदाज ‘न्युक्लिअर मेडिसीन’मधून मिळतो. स्नायू मृत झाले असतील तर ‘स्टेंट’चा काही उपयोग होत नाही. एकूणच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार होते. शिवाय, या अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधीही उपलब्ध होणार होत्या. परंतु या सर्वांनाच आता ग्रहण लागले आहे.