आता ‘टास्क फोर्स’ची प्रतीक्षा
By Admin | Updated: September 18, 2015 02:53 IST2015-09-18T02:53:11+5:302015-09-18T02:53:11+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरणे बरखास्त झाली आहेत. नव्या विद्यापीठ कायद्याच्या पार्श्वभूमीवर ...

आता ‘टास्क फोर्स’ची प्रतीक्षा
नागपूर विद्यापीठ : प्राधिकरणांऐवजी पर्यायी व्यवस्था
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरणे बरखास्त झाली आहेत. नव्या विद्यापीठ कायद्याच्या पार्श्वभूमीवर वर्षभर निवडणुका होणार नसल्यामुळे प्रशासनाच्याच हातीच विद्यापीठाची संपूर्ण धुरा आहे. परंतु प्राधिकरणांशिवाय कामकाज चालविणे अवघड जाणार असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे. या ‘टास्क फोर्स’च्या स्थापनेच्या हालचाली कधी सुरू होतात, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सर्व पारंपरिक विद्यापीठांसाठी सध्या असलेला महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ हा रद्द करून नवीन सर्वसमावेशक असा कायदा राज्य सरकारकडून डिसेंबरमध्ये आणण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या सिनेट, विद्यापीठ प्राधिकरणे, मंडळे आदींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ३१ आॅगस्टनंतर प्राधिकरण सदस्यांची रिक्त झालेली पदे कोणत्याही पद्धतीने वर्षभर भरण्यात येऊ नयेत, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेत असताना प्राधिकरणांना मुदतवाढ मिळालेली नाही. मात्र विद्यापीठाचे कामकाज प्राधिकरणांशिवाय चालविणे ही कठीण बाब आहे. त्यामुळेच प्राधिकरणांचे काम करण्यासाठी विद्यापीठात ‘टास्क फोर्स’ निर्माण करण्यात येणार आहे. या ‘टास्क फोर्सह्णद्वारे विद्यापीठातील विविध निर्णय घेण्यात येतील. यात प्रामुख्याने वित्त, अभ्यासक्रम, परीक्षा यांच्याशी संबंधित मुद्यांवर भर देण्यात येईल.(प्रतिनिधी)
‘टास्क फोर्स’मध्ये असणार कोण?
विद्यापीठाचे काम सुरळीत चालावे यासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘टास्क फोर्स’मध्ये विषयाचे तज्ज्ञ, विद्यापीठाचे अधिकारी तसेच विविध विभागप्रमुखांचा समावेश राहण्याची शक्यता आहे. ‘टास्क फोर्सह्णच्या माध्यमातून विद्यार्थी व विद्यापीठाच्या विकास आणि हिताचे निर्णय घेण्यावर भर राहील, असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.