आता संयम नाही, आंदोलन करणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST2021-03-17T04:07:42+5:302021-03-17T04:07:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : थकीत वीजबिलाच्या मुद्द्यावरून भाजपने परत एकदा राज्यभरात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. लॉकडाऊन लावून ...

आता संयम नाही, आंदोलन करणारच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थकीत वीजबिलाच्या मुद्द्यावरून भाजपने परत एकदा राज्यभरात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. लॉकडाऊन लावून सरकारने लोकांना घरात बसविले आहे आणि दुसरीकडे वीजजोडण्या कापल्या जात आहेत. त्यामुळे गरमीत लोकांचे हाल होत आहेत. कोरोना असल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेतले होते. परंतु आता संयम दाखविणार नाही व आंदोलन करणारच. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला तर मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
मंगळवारी नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. आम्ही जेलभरो आंदोलन स्थगित केले होते. मात्र सरकारला जनतेच्या हिताची पर्वा नाही. सरकारच लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडत आहे. नोटीस न देता वीजजोडणी कापण्यात येत आहे. कुणी आक्षेप घेतला तर गुन्हा दाखल होत आहे. एकाप्रकारे सरकारची गुंडगिरीच सुरू आहे. थकबाकीहून जास्त दंडव्याज लावत आहेत. जनतेचा उद्रेक झाल्यास जबाबदारी सरकारचीच असेल, असे बावनकुळे म्हणाले. पत्रपरिषदेला आ. बंटी भांगडिया, अरविंद गजभिये, चंदन गोस्वामी, सुनील मित्रा, अविनाश खळतकर, अजय बोढारे प्रामुख्याने उपस्थित होते.
मंत्र्यांवर कारवाई का नाही...
सरकारने कोरोनाची नियमावली जाहीर केल्यानंतर आम्ही जेलभरो आंदोलन पुढे ढकलले. पण सरकारच्या मंत्र्यांनी मात्र हजारोंची गर्दी जमवली. त्यांच्यावर काहीच कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला.