आता ‘मेडिकल’प्रमाणे होणार ‘एमबीए’चा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 12:00 IST2019-02-28T11:59:33+5:302019-02-28T12:00:29+5:30
‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांचा वाढता आकडा पाहून ‘एआयसीटीई’ने कठोर निर्णय घेतला आहे. यानुसार आता ‘एमबीए’चा अभ्यास हा ‘मेडिकल’ अभ्यासक्रमाप्रमाणे होणार आहे.

आता ‘मेडिकल’प्रमाणे होणार ‘एमबीए’चा अभ्यास
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांचा वाढता आकडा पाहून ‘एआयसीटीई’ने कठोर निर्णय घेतला आहे. यानुसार आता ‘एमबीए’चा अभ्यास हा ‘मेडिकल’ अभ्यासक्रमाप्रमाणे होणार आहे. सद्यस्थितीत ‘एमबीए’मध्ये चार सत्र आहेत. हे सर्व सत्र उत्तीर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यांना पदवी मिळते. मात्र नवीन नियमांनुसार चार सत्र पूर्ण झाल्यानंतर ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन वर्षांत उद्योजकतेचे प्रशिक्षण घ्यावे लागेल व उद्योजक झाल्याचा पुरावा दिल्यानंतरच पदवी मिळू शकेल.
‘लोकमत’शी विशेष संवादादरम्यान ‘एआयसीटीई’चे उपाध्यक्ष डॉ.एम.पी.पुनिया यांनी हा खुलासा केला आहे. उद्योजक झाल्याचा पुरावा देणे विद्यार्थ्यांना अनिवार्य असणार आहे. विद्यार्थ्यांना उद्योजकता प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर उद्योग स्थापित करण्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत याची काळजी नवीन तरतुदींमध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी महाविद्यालयांना आर्थिक मदत करावी लागेल. ‘एमबीए’ महाविद्यालयांना हे अनिवार्य करण्यात येईल. यासाठी महाविद्यालय व संस्थांसाठी बनविण्यात आलेले नियम व मापदंड यात बदल करण्यात येईल. या मापदंडांवर खरे न उतरणाऱ्या महाविद्यालयांना ‘एआयसीटीई’ मान्यताच देणार नाही. विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडावे यासाठी त्यानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.