Now, remove the financial worries of the poor! Nitin Gadkari | आता, गरिबांची आर्थिक विवंचना दूर करा! नितीन गडकरी
आता, गरिबांची आर्थिक विवंचना दूर करा! नितीन गडकरी

ठळक मुद्दे‘भावसुमनांची ओंजळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाबासाहेबांचे लंडनमधील घर विकत घेऊन राजकुमार बडोले यांनी देशाला एक आंतरराष्ट्रीय स्मारक दिले आहे. त्यांनी सामाजिक न्याय देण्याचे प्रयत्न अग्रक्रमाने केले आहे. आता, त्यांनी इनोव्हेशन, डेव्हलपमेंटचा विचार तळागाळातल्या आर्थिक विवंचनेत जगणाऱ्यांची समस्या दूर करण्याचे प्रयत्न करावे, असा मौलिक सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे दिला.
युगंधर क्रिएशन्सच्या वतीने शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित सोहळ्यात, शारदा बडोले यांच्या ‘भावसुमनांची ओंजळ’ या पहिल्याच कवितासंग्रहाचे प्रकाशन गडकरी यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध आंबेडकरी विचारक रावसाहेब कसबे, माजी मंत्री राजकुमार बडोले, वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एस. थूल, लेखिका जुल्फी शेख उपस्थित होते. याप्रसंगी दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
उदारमतवाद आणि दहशतवाद अशा दोन मतांचा फार मोठा वैचारिक संघर्ष जगात सुरू आहे. भगवान बुद्धाने दिलेला जगण्याचा संदेश अखिल मानवतेसाठीचा आहे. त्याच्या विचारांची प्रेरणा बाबासाहेबांनी घेतली आणि सामाजिक व शैक्षणिक क्रांती घडली आहे. आता त्यापुढे जाऊन, ज्ञान-विज्ञानाच्या बाबतीत काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. विज्ञान आधारित आर्थिक प्रगती व विकासाच्या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. त्याच अनुषंगाने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांना डिझेलमुक्त करण्याचे कार्य सुरू झाले असून, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तणसापासून बायोसीएनजीचे २०० प्रकल्प उभे राहू शकतात आणि १० हजारांवर युवकांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याअनुषंगाने कार्य करण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. याप्रसंगी रावसाहेब कसबे यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. संदेश वाघ यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. डॉ. अनिल खोब्रागडे व प्रख्यात गायिका बेला शेंडे यांनी कवितासंग्रहातील दोन गीतांची प्रस्तुती दिली.
शारदा यांना अपघात
शारदा बडोले यांना सकाळी बागेत फिरताना अपघात झाल्याने, त्या प्रकाशन सोहळ्याला हजर राहू शकल्या नाही. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.


Web Title: Now, remove the financial worries of the poor! Nitin Gadkari
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.