आता मालमत्ता कर किमान ५00 रुपये
By Admin | Updated: May 13, 2014 00:59 IST2014-05-13T00:59:38+5:302014-05-13T00:59:38+5:30
गेल्या अनेक वर्षांंपासून नागपुरात कुणावर वार्षिक ४0 रुपये तर कुणावर १00 रुपये मालमत्ता कर आकारला जात होता.

आता मालमत्ता कर किमान ५00 रुपये
नागपूर : गेल्या अनेक वर्षांंपासून नागपुरात कुणावर वार्षिक ४0 रुपये तर कुणावर १00 रुपये मालमत्ता कर आकारला जात होता. अशा मालमत्ता कराचा महापालिकेने अभ्यास केला. यानंतर किमान मालमत्ता कर ५00 रुपये आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे ही रक्कम आम जल कर वगळून आहे. यासंबंधीचा निर्णय कर संकलन व वसुली समितीने घेतला होता. त्याला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयामुळे शहरातील सुमारे ७५ हजार गरीब नागरिकांवर कराचा भुर्दंंड पडणार आहे. आता संबंधित प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर केला जाईल. संबंधित निर्णयामुळे महापालिकेला ३ कोटी २५ लाख रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे. मालमत्ता कर विभाग गेल्या वर्षभरापासून ५00 रुपयांपेक्षा कमी कर भरणार्यांची यादी तयार करण्याच्या कामी लागला होता. ही यादी तयार झाली तेव्हा तब्बल ७५ हजारावर घरांवर नाममात्र कर आकारला जात असल्याचे समोर आले. त्यामुळे किमान ५00 रुपये कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी सांगितले की, मालमत्ता कर हस्तांतरणासाठी(नामांतरण)पूर्वी ४५0 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, स्थायी समितीने एक हजार रुपये घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. प्रशासनाने तीन हजार रुपये नामांतरण शुल्क वसुलीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, संबंधित प्रस्ताव अधिक होता. यामुळे कर संकलन व वसुली समितीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. सार्वजनिक नळ लावणे, त्यावर जल कर आकारणे तसेच कचरा, दूषित पाणी गोळा करून त्यावर कर आकारण्याचे निर्देश आयुक्त देतात. मात्र, नव्या महापालिका कायद्यानुसार स्थायी समितीने असा निर्णय घेतला आहे की, सार्वजनिक नळांवर जल कर लावण्याचा अधिकार जलप्रदाय विभाग तसेच साफसफाई कर, मलप्रवाह कर लावण्याचा अधिकार आरोग्य विभागाला दिले जावे. (प्रतिनिधी)