Now online lottery for Pantapradhan Gharkul: CM's approval | पंतप्रधान घरकुलासाठी आता ऑनलाईन सोडत : मुख्यमंत्र्यांची मान्यता
पंतप्रधान घरकुलासाठी आता ऑनलाईन सोडत : मुख्यमंत्र्यांची मान्यता

ठळक मुद्देएनएमआरडीएच्या १५२९.८४ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरीनासुप्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही घरकुलात आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एनएमआरडीएच्या विविध विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षाच्या १५२९.८४ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एनएमआरडीए क्षेत्रात बांधण्यात आलेल्या घरकुलांची विक्री ऑनलाईन सोडतीद्वारे आणि घरकुल वाटपासाठी आरक्षण धोरण ठरविण्यासही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) पाचवी बैठक गुरुवारी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झाली. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, महापौर नंदा जिचकार, आमदार मिलिंद माने यावेळी उपस्थित होते. या बैठकीत घरकुल वाटपाकरिता आरक्षण धोरणासही मान्यता देण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जाती ११ टक्के, अनुसूचित जमाती ६ टक्के, दिव्यांग ५ टक्के, नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी २ टक्के आणि राज्य शासकीय/निमशासकीय कर्मचारी ५ टक्के असे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरक्षित घटकातील घरकुलास पात्र लाभार्थी उपलब्ध न झाल्यास ही घरकुले सर्वसाधारण गटात सोडतीद्वारे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेतील कामांची देयके प्राधिकरणाच्या निधीतून मंजूर कण्यास २५ कोटींची मर्यादा होती. ती १०० कोटी करण्यात आली आहे. बैठकीस गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मनीषा म्हैसकर, नागपूर विभागीय आयुक्त संजीवकुमार, नागपूर महापालिका आयुक्त अभिजित बांगर, एनएमआरडीएच्या महानगर आयुक्त शीतल तेली-उगले आदी उपस्थित होते.
प्रतिनियुक्तीवर मिळतील १५६ कर्मचारी
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आवश्यक १५६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येस व ती पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास मान्यता देण्यात आली. तसेच एनएमआरडीच्या कार्यकारी समितीमध्ये करण्यात आलेल्या सहा अशासकीय नियुक्तीलाही यावेळी मंजुरी प्रदान करण्यात आली. यावेळी एनएमआरडीएच्या बोधचिन्हाबाबत सादरीकरण करण्यात आले.
काय काय होणार
फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटेन, साऊंड लेझर शो व अंबाझरी तलाव परिसरातील स्वामी विवेकानंद स्मारक परिसरात साऊंड लाईट शोसाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कार्य                                   निधी
पंतप्रधान घरकूल योजना ४२२ कोटी
कोराडी तीर्थक्षेत्र विकास आराखडा २२१ कोटी
ताजबाग दर्गा विकास आराखडा १३२ कोटी
पोलीस गृहनिर्माण प्रकल्प १४५ कोटी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर ११४ कोटी
दीक्षाभूमी विकास १०९ कोटी
फुटाळा तलाव संगीत कारंजे १०० कोटी
शांतिवन चिचोली ४१ कोटी
चोखामेळा वसतिगृह ५८ कोटी

 

 


Web Title: Now online lottery for Pantapradhan Gharkul: CM's approval
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.