आता घरबसल्या लर्निंग लायसन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:32 PM2021-06-10T23:32:04+5:302021-06-10T23:32:30+5:30

Now learning license at home केंद्र शासनाने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्या आधारावर घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) काढणे अधिक सोपे झाले आहे.

Now learning license at home | आता घरबसल्या लर्निंग लायसन्स

आता घरबसल्या लर्निंग लायसन्स

Next
ठळक मुद्देआधार क्रमांकावर आधारित सेवा : नव्या वाहनांची निरीक्षकांकडून तपासणीही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र शासनाने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्या आधारावर घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) काढणे अधिक सोपे झाले आहे. यासाठी अर्जदाराला परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर स्वत:चा आधारकार्ड नंबर टाकल्यावर व विचारलेल्या प्रश्नांची ६० टक्के अचूक उत्तरे दिल्यावर लर्निंग लायसन्सची प्रिंट मिळणार आहे. यामुळे आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होऊन दलालांना फाटा बसण्याची शक्यता आहे.

आरटीओ कार्यालयात दलालांची मदत घेतल्याशिवाय वाहनपरवाना निघतच नसल्याचे चित्र होते. त्यावर उपाययोजना म्हणून परिवहन विभागाने ऑनलाइन अपॉइंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली. परंतु, सकाळी १० वाजताची अपॉइंटमेंट घेऊनही संगणक चाचणी परीक्षा व हातात लर्निंग लायसन्स पडेपर्यंत दिवस जायचा. यातही ऑनलाइन अपॉइंटमेंट घेताना अनेक बारीकसारीक गोष्टी संकेतस्थळावर भराव्या लागत असल्याने अनेकांना ते जमतही नाही. यामुळे आरटीओ कार्यालयाच्या परिसरात व बाहेर लॅपटॉप घेऊन बसणा-या दलालांच्या ऑनलाइन सेवेची अनेकांवर मदत घेण्याची वेळ येत होती. या सेवेसाठी ५०० ते १००० रुपये आकारले जात होते. आरटीओसमोरच हे धंदे सुरू असताना कार्यालयाचा यावर वचक नव्हता. बहुसंख्य दलाल कार्यालयातील कर्मचा-यांच्या थेट संपर्कात असल्याने एखाद्या अडलेल्या अर्जदारालाही दलालांचा रस्ता दाखविला जात होता. परंतु, आता केंद्र शासनाने आधार क्रमांकाच्या मदतीने ‘फेसलेस’ सेवा सुरू केल्याने याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषत: कोरोनाकाळात शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी उचललेल्या या पावलाचे कौतुकही होत आहे.

असा करा अर्ज

राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी वाहन व सारथी ४.० प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करून ‘लर्निंग लायसन्स’ची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी अर्जदाराने ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर जाऊन ‘सारथी’ हे ऑपरेशन सिलेक्ट करून त्यात आधारकार्डाचा नंबर टाकून मागितलेली माहिती भरावयाची आहे. त्यानंतर रस्तासुरक्षाविषयक व्हिडीओ दिसेल. त्यानंतर विचारल्या जाणा-या प्रश्नांमधून ६० टक्के प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास लर्निंग लायसन्सची प्रिंट मिळणार आहे. सोबतच नमुना १ (अ) मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा डॉक्टरांमार्फत ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तर जावे लागणार कार्यालयात

ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही किंवा त्यांना या सेवेचा लाभ घ्यावयाचा नाही, अशा अर्जदारांना पूर्वीप्रमाणेच परिवहन या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज, डॉक्युमेंट अपलोड, शुल्क भरून व स्लॉट बुकिंग करून कार्यालयामध्ये लर्निंग लायसन्ससाठीची चाचणी देता येणार आहे.

प्रथम नोंदणीच्यावेळी निरीक्षकांमार्फत वाहन तपासणीची आवश्यकता नाही

केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार आता परिवहनेतर संवर्गातील नवीन वाहनांच्या प्रथम नोंदणीकरिता मोटार वाहन निरीक्षकांमार्फत यापुढे वाहन तपासणीची आवश्यकता असणार नाही. तसेच वाहन विक्रेत्याने शुल्क व कर भरल्यानंतर नोंदणी क्रमांक आपोआप जारी होणार आहे. वितरकांनी विक्री केलेल्या वाहनांची कागदपत्रे डिजिटल स्वाक्षरीच्या मदतीने आरटीओ कार्यालयात पाठवावे लागणार आहे. यामुळे कार्यालयातील गर्दी कमी होण्याची व वेळेची बचत होणार आहे.

आठवडाभरात ही प्रणाली सुरू

घरी बसून लर्निंग लायसन्सचा लाभ घेण्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. परिवहन विभागाच्या ‘सारथी’ या संकेतस्थळावर काही बदल केले जात आहे. या नव्या प्रणालीमुळे कार्यालयातील गर्दी कमी होऊन, अर्जदाराच्या वेळेची बचत होणार आहे.

-विनोद जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर

Web Title: Now learning license at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.