आता ‘वॉट्स अॅप’वरही तक्रारींची दखल
By Admin | Updated: May 2, 2015 02:22 IST2015-05-02T02:22:22+5:302015-05-02T02:22:22+5:30
कडक उन्हाळ्यात दूध, शीतपेय किंवा बाटलीबंद पाण्यासाठी अतिरिक्त कुलिंग चार्जेस घेणाऱ्या दुकानदारांची तक्रार

आता ‘वॉट्स अॅप’वरही तक्रारींची दखल
नागपूर : कडक उन्हाळ्यात दूध, शीतपेय किंवा बाटलीबंद पाण्यासाठी अतिरिक्त कुलिंग चार्जेस घेणाऱ्या दुकानदारांची तक्रार ‘वॉट्स अॅप’वर करण्याचे आवाहन वैधमापन विभागाचे नागपूर विभागीय उपनियंत्रक (प्रभारी) ललित हारोडे यांनी लोकमतशी बोलताना केले. तक्रारीसाठी विभागाने ९८६९६९१६६६ हा वॉट्स अॅप क्रमांक जारी केला आहे.
ग्राहकांना कुलिंग चार्ज घेणाऱ्या दुकानदाराची तक्रार ‘वॉट्स अॅप’वर करायची आहे. तक्रारीत ग्राहकाचे नाव, दुकानदाराचे नाव, शहराचे नाव, परिसर, उत्पादनाची माहिती द्यायची आहे. ग्राहकाच्या तक्रारीची नोंद थेट मुंबई येथील मुख्य नियंत्रक कार्यालयात होणार आहे. मुख्य कार्यालयातून आलेल्या निर्देशानुसार विभागीय स्तरावर, जिल्हानिहाय अधिकारी संबंधित दुकानाची तपासणी करतील आणि कारवाई करून दंड आकारतील. या कारवाईची माहिती विभागीय अधिकारी मुख्य कार्यालयाला देतील. यासाठी ग्राहकांना पुढे येण्याची गरज आहे. कूलिंग चार्ज देऊ नका, घेतल्यास बिल मागा, हारोडे म्हणाले.
एप्रिल महिन्यात जवळपास ७ ग्राहकांनी वॉट्स अॅपद्वारे विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावर विभागाने कारवाई करून दंडही आकारला. दुकानदारांकडून उत्पादनाच्या छापील किमतीवर कूलिंग चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क वसूल करण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी विभागाने वॉट्स अॅपद्वारे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. छापील किमतीपेक्षा जास्त शुल्क आकारणाऱ्या दुकानदारावर फौजदारी कारवाईऐवजी सध्या २ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न व प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी अशा गुन्ह्यात दंडासह फौजदारी कारवाईचे सूतोवाच केले आहे. (प्रतिनिधी)