आता शहराचा ‘स्मार्ट’विकास
By Admin | Updated: March 12, 2017 02:37 IST2017-03-12T02:37:21+5:302017-03-12T02:37:21+5:30
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री

आता शहराचा ‘स्मार्ट’विकास
पदाधिकाऱ्यांची ग्वाही : स्थायी समिती अध्यक्षांचा पदग्रहण समारंभ
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे कशाचीही उणीव भासणार नाही. आता शहराचा विकास थांबणार नाही, तो ‘स्मार्ट’ दिशेने होईल, अशी ग्वाही शनिवारी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांच्या पदग्रहण समारंभात पदाधिकाऱ्यांनी दिली. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळाल्याने पदग्रहण समारंभात उत्साहाचे वातावरण होते.
जाधव यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर महापालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप जाधव, माजी अध्यक्ष बंडू राऊ त, माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, भाजपाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर आदी उपस्थित होते.
महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे आहे. आर्थिक अडचणीचे आव्हान स्वीकारून शहराचा विकास करू, अशी ग्वाही नंदा जिचकार यांनी दिली. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शहरातील आमदार पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे विकास कामांना कोणतीही बाधा येणार नाही. महापालिकेतील सर्व पक्षाच्या नगरसेवकांना न्याय देण्याची भूमिका राहील. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शहरातील ४० लाख नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू, असा विश्वास सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केला. नागपूर शहराला देशातील नंबर वन शहर बनविण्याचा देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी संकल्प केला आहे. त्यादृष्टीने महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांना काम करावयाचे आहे. आर्थिक आव्हान स्वीकारून पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन सुधाकर देशमुख यांनी केले.
जाधव यांच्याकडे महापालिकेच्या तिजोरीची चावी सोपविली आहे. त्यांच्यापुढे आव्हान असले तरी सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशी ग्वाही संदीप जोशी यांनी दिली. गेल्या वर्षभारत शहरात विविध विकास योजना राबविण्यात आल्याची माहिती बंडू राऊ त यांनी दिली. जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)