आता मुख्यमंत्र्यांनीच न्याय द्यावा
By Admin | Updated: January 17, 2017 01:50 IST2017-01-17T01:50:44+5:302017-01-17T01:50:44+5:30
आधुनिक भारतातील राष्ट्रपुरुष व ‘जगाला प्रेम अर्पावे’ अशी शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा राज्य शासनाला पडलेला विसर अनुयायांच्या जिव्हारी लागला आहे.

आता मुख्यमंत्र्यांनीच न्याय द्यावा
अनुयायींची अपेक्षा : तुकडोजी महाराज, गाडगेबाबांचा शासनाला विसर पडल्याबाबत व्यक्त केली नाराजी
नागपूर : आधुनिक भारतातील राष्ट्रपुरुष व ‘जगाला प्रेम अर्पावे’ अशी शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा राज्य शासनाला पडलेला विसर अनुयायांच्या जिव्हारी लागला आहे. या दोन्ही संतांनी आयुष्यभर समाजसुधारक विचारांची शिदोरी वाटली. त्यांचे विचारधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी शासनाने थोर पुरुषांच्या यादीतूनच त्यांचे नाव वगळल्याबाबत समाजाच्या विविध स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यासंबंधात पुढाकार घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
राज्यातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांत राष्ट्रीय सणांसोबतच वर्षभर राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यात येते. यासंदर्भात राज्य शासनाकडून दरवर्षी परिपत्रक काढण्यात येते.
२०१७ सालाच्या यादीमध्ये तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा दोघांचेही नाव नाही. अशा स्थितीत विद्यापीठांमध्ये या दोन्ही संतांच्या विचारांचा जागर कसा होणार, असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. राज्य शासनाच्या या धोरणावर समाजातील विविध स्तरांतून नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
शासनाने मानसिकता बदलावी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या दोघांचेही कार्य तळागाळात रुजले आहे. नवीन पिढीपर्यंत ते काम पोहोचायलाच हवे. मात्र शासनाच्या यादीतच त्यांचे नाव नसणे ही दुर्दैवी बाब आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वात अगोदर तर आपली मानसिकता बदलायला हवी. मुख्यमंत्री, वित्तमंत्री विदर्भातीलच आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन या दोन्ही राष्ट्रपुरुषांचे कार्य राज्यातील सर्व विद्यापीठांत पोहोचावे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केली.
नाव झाले, कार्य कधी पोहोचणार ?
नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. नाव तर देऊन झाले, आता त्यांचे कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील थोर पुरुषांच्या यादीत या दोघा राष्ट्रपुरुषांचे नाव नाही ही धक्कादायक बाब आहे. शासन त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यायचा तेव्हा घेईल, मात्र आम्ही अध्यासनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले.
अत्यंत वेदनादायी बाब
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर समाजप्रबोधनाचे कार्य केले. कधी कुणामध्ये भेदभाव केला नाही. मात्र शासनाने त्यांच्यासोबत भेदभाव केला. हे पाहून अत्यंत वेदना झाल्या. हे दोघेही राष्ट्रीय महात्मे आहेत. त्यांच्या जयंतीचे सर्व विद्यापीठांत कार्यक्रम झालेच पाहिजेत. शासनाने अप्रत्यक्षपणे या दोघाही महापुरुषांचा अपमानच केला आहे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सहकारी व ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन भिसेकर यांनी व्यक्त केले.