थकबाकी नाही तरी जप्तीची नोटीस
By Admin | Updated: October 6, 2015 03:54 IST2015-10-06T03:54:41+5:302015-10-06T03:54:41+5:30
महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. झोननिहाय कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात

थकबाकी नाही तरी जप्तीची नोटीस
नागपूर : महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. झोननिहाय कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु उद्दिष्टपूर्तीच्या नावाखाली मालमत्ता कर थकबाकी नसतानाही थकबाकी असल्याचे दर्शवून नेहरूनगर झोनच्या कर आकारणी व कर वसुली विभागाने घर जप्तीची नोटीस बजावली आहे.
नंदनवन भागातील वॉर्ड क्रमांक २० मधील सद्भावनानगर येथील ११२८ क्रमाकांच्या घरावर १३ हजार ९०८ रुपयांचा कर थकबाकी असल्याने २७ फेब्रुवारी २०१५ रोजी वसुलीची नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतर ३१ मार्च २०१५ रोजी थकबाकी भरण्यात आली.
परंतु थकबाकी भरल्याबाबत झोनच्या जप्ती विभागाला कल्पना नसल्याने त्यांनी १६ सप्टेंबर २०१५ रोजी थकबाकी न भरल्याचे कारण सांगून घरावर जप्तीची नोटीस लावली आहे. जप्ती नोटीसमध्ये थकबाकीसह नोटीस फी, वॉरंटी फी, दहा टक्के खर्च अशी एकूण २८ हजार ८५७ रुपयांची वसुली दर्शविण्यात आली. वास्तविक सहा महिन्यांपूर्वी थकबाकी भरलेली असतानाही जप्तीची नोटीस बजावण्यात आल्याने नत्थुजी ठाकरे यांनी झोनचे सहायक आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. परंतु विभागाची चुकी असूनही याची कबुली दिली नाही.
वास्तविक कर वा थकबाकी भरल्यानंतर विभागाच्या रेकॉर्डला नोंद होणे गरजेचे आहे. किमान जप्ती नोटीस बजावण्यापूर्वी कर भरलेला आहे की नाही, याची शहानिशा करण्याची जबाबदारी विभागाची आहे.
घरावर नोटीस लावण्यापूर्वी संबंधितांना विचारणा करण्याची गरज आहे. परंतु क ोणत्याही स्वरुपाची शहानिशा न करता थकबाकी नसतानाही जप्ती नोटीस बजावण्यात येत असल्याने नियमित कर भरणाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने प्रत्येक झोनला मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्ती करताना नियमित कर भरणारे वा थकबाकी नसलेल्यांवर अन्याय होणार नाही याचीही विभागाने खबरदारी घेण्याची गरज आहे. यासंदर्भात आयुक्तांनी झोनच्या सहायक आयुक्तांना निर्देश देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)