Notorious gangster arrested | कुख्यात गुंडांची टोळी जेरबंद

कुख्यात गुंडांची टोळी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास करताना अजनी पोलिसांनी कुख्यात गुंडांची एक टोळी जेरबंद केली. त्यांच्याकडून आतापावेतो चार गुन्हे उघड झाले असून, दीड लाखाचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला. प्रीतम अलोक उईके (वय २५, रा. सरस्वतीनगर, हुडकेश्वर), अमन पंढरीनाथ अहिरकर (वय २२, रा. भोलेबाबानगर) आणि पंकज प्रभाकर साठवणे (वय २५, रा.सोमवारी क्वॉर्टर) अशी या भामट्यांची नावे आहेत.

अजनीच्या शिवशक्तीनगर माता मंदिरजवळ राहणाऱ्या पुष्पा उपाध्याय (वय ३८) त्यांच्या नणंदेसोबत किराणा घेण्यासाठी २ मार्चला दुपारी घराबाहेर पडल्या. ॲक्टिव्हाने आलेल्या दोन भामट्यांनी पुष्पा यांच्या गळ्यातील ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर अजनी पोलिसांनी शोधाशोध सुरू केली असता हा गुन्हा कुख्यात चेनस्नॅचर प्रीतम उईके याने केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला अटक करून नंतर त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचे साथीदार अमन अहिरकर तसेच पंकज साठवणेला अटक केली. या तिघांनी चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्याची कबुली देतानाच अजनीत दोन घरफोड्या केल्याचे आणि हुडकेश्वरमध्ये एक वाहन चोरल्याचीही कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र तसेच अन्य चिजवस्तूंसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

---

आणखी काही गन्ह्यांची शक्यता

हे तिघेही सराईत गुन्हेगार असून एकावर तीन, दुसऱ्यावर चार तर तिसऱ्यावर १२ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उजेडात आले आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, एसीपी नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजनीचे ठाणेदार विनोद चाैधरी यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक एस. एन. गायकवाड, उपनिरीक्षक एन. टी. फड, नायक मनोज काळसर्पे, भगवतीकुमार ठाकूर, आशिष राऊत, रितेश गोतमारे आणि संतोष नल्लावार यांनी ही कामगिरी बजावली.

----

Web Title: Notorious gangster arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.