लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या नातेवाईकासह एका टाईल्स व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक करणारा गँगस्टर संतोष आंबेकर आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध लकडगंज ठाण्यात पुन्हा दोन गुन्हे दाखल झाले आहेत. कुख्यात आंबेकरविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष कारवाईनंतर आंबेकरविरुद्ध उघडपणे तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढल्याने पोलिसांच्या कारवाईचे ते यश मानले जात आहे.फिर्यादी अरविंद सुरेश यादव (वय ३५) हे मंगलदीपनगरातील अभिजितनगरात राहतात. आरोपी आंबेकर त्यांचा भाचेजावई लागतो. त्यांनी काही वर्षांपूर्वी आंबेकरला मौजा बेलगाव (ता. उमरेड, जि. नागपूर) येथील एक जमीन खरेदी करायची आहे, असे सांगितले. त्यासाठी यादव यांनी कुख्यात आंबेकरकडून २० लाख रुपये उधार मागितले. सुरुवातीस आंबेकरने त्यांना सदर जमिनीत भागीदारी हवी म्हटले होते. त्याला होकार देऊन यादव यांनी आंबेकरकडून २० लाख रुपये घेतले. रक्कम घेतल्यानंतर एकाच महिन्यात त्याने यादव यांना आपली रक्कम व्याजासह परत मागितली. यादव यांनी अवघ्या दोन महिन्यात आंबेकरला अडीच लाख व्याज आणि २० लाख मुद्दल परत केली. मात्र, तू मी दिलेल्या रकमेवर भरपूर पैसे कमविले असे सांगून पुन्हा ३ लाख ६० हजार मागितले. ते देण्यास नकार दिला असता शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि ३ लाख ६० हजार वसूल केले. कळस म्हणजे, त्यानंतर तुझ्यावर मी दिलेल्या रकमेचे १५ लाख रुपये व्याज झाले, असे म्हणत यादव यांना आंबेकरने त्याचा साथीदार आरोपी राजू अरमरकर (सराफा) तसेच भाचा नीलेश केदार यांच्याकडे पाठविले. या दोघांनी यादव यांच्या घराची कागदपत्रे तयार करून १० लाख रुपये ३ टक्के प्रति महिना व्याजाने दिले. अशाप्रकारे एकूण २५ लाख रुपयांचे प्रति महिन्याला व्याज म्हणून आरोपी ७५ हजार रुपये वसूल करू लागले. आंबेकर टोळीच्या दहशतीमुळे यादव गप्प होते. मात्र, आता त्याचे पाप उघड झाल्याने आणि पोलिसांनी त्याला कायद्याचा बडगा दाखविल्यामुळे यादव यांनी बुधवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार लिहून दिली.त्याआधारे लकडगंज ठाण्यात कुख्यात आंबेकर, त्याचा साथीदार अरमरकर आणि भाचा नीलेश केदार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.साडेनऊ लाखांची टाईल्स हडपलीकुख्यात आंबेकर आणि त्याचे भाचे आरोपी नीलेश केदार (३४) तसेच शैलेष केदार (वय ३३) या तिघांनी जून २०१७ मध्ये फिर्यादी मयूर शांतिभाई मनपरा पटेल (वय ३४) यांच्याकडून ९ लाख ३० हजारांची टाईल्स विकत नेली होती. ती रक्कम मागितली असता आरोपी पटेल यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी द्यायचे. एवढेच काय, एकदा अडचणीत आरोपी शैलेष केदार याने पटेल यांना ५० हजार रुपये दिले आणि त्याचे अव्वाच्यासव्वा व्याज मागून ते न दिल्यास ठार मारू, अशी धमकी दिली. पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज ठाण्यात आरोपी आंबेकर आणि त्याचे दोन्ही भाचे नीलेश तसेच शैलेष या तिघांविरुद्ध सावकारी कायदा २०१४ चे कलम ४४,४५ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांचा यापूर्वीच्या गुन्ह्यातील पीसीआर संपल्यावर या गुन्ह्यात त्याला अटक करून चौकशी केली जाणार आहे.
नागपुरातील कुख्यात आंबेकरने नातेवाईकालाही गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 00:07 IST
स्वत:च्या नातेवाईकासह एका टाईल्स व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक करणारा गँगस्टर संतोष आंबेकर आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध लकडगंज ठाण्यात पुन्हा दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
नागपुरातील कुख्यात आंबेकरने नातेवाईकालाही गंडविले
ठळक मुद्दे२० लाख उधार देऊन व्याजासह मागितले ४५ लाखमहिन्याला व्याजापोटी उकळत होता ७५ हजार : टाईल्स व्यापाऱ्यालाही गंडा, जीवे मारण्याची धमकी : लकडगंजमध्ये दोन गुन्हे दाखल