नवीन न्यायमूर्तींच्या नियुक्तीची अधिसूचना जारी

By Admin | Updated: June 1, 2017 02:38 IST2017-06-01T02:38:52+5:302017-06-01T02:38:52+5:30

केंद्रीय विधी व न्याय विभागातर्फे आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात १४ नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींची नियुक्ती

Notification of appointment of new judges | नवीन न्यायमूर्तींच्या नियुक्तीची अधिसूचना जारी

नवीन न्यायमूर्तींच्या नियुक्तीची अधिसूचना जारी

हायकोर्ट : तीन नागपूरकर विधिज्ञांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय विधी व न्याय विभागातर्फे आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात १४ नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली. नवीन न्यायमूर्तींमध्ये महाधिवक्ता रोहित देव, मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व सर्वोच्च न्यायालयातील वकील मनीष पितळे या तीन नागपूरकर विधिज्ञांचा समावेश आहे.
१४ पैकी ८ न्यायमूर्तींची विविध जिल्ह्यांतील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांमधून तर, ६ न्यायमूर्तींची वकिलांमधून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या शपथविधीची तारीख जाहीर झालेली नाही. उच्च न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्या ४ जून रोजी संपत असून, ५ जूनपासून नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वांना येत्या शुक्रवारी म्हणजे, २ जून रोजी शपथ दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शपथविधीनंतर नवीन न्यायमूर्तींना मुंबई, औरंगाबाद व नागपूर यापैकी एका ठिकाणी नियुक्ती दिली जाईल.

रिक्त पदांची संख्या घटली
नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नियुक्तीमुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या रिक्त पदांची संख्या घटली आहे. नवीन नियुक्त्यांपूर्वी कायम न्यायमूर्तींची १६ व अतिरिक्त न्यायमूर्तींची १७ अशी एकूण ३३ पदे रिक्त होती. रिक्त पदांची संख्या आता १९ वर आली आहे. आतापर्यंत ५५ कायम व ६ अतिरिक्त न्यायमूर्ती कार्यरत होते. अतिरिक्त न्यायमूर्तींची संख्या वाढून २० झाली आहे. उच्च न्यायालयाला कायम न्यायमूर्तींची ७१ व अतिरिक्त न्यायमूर्तींची २३ अशी एकूण ९४ पदे मंजूर आहेत. अतिरिक्त न्यायमूर्तींची सुरुवातीची दोन वर्षे परीविक्षा काळ असतो. या काळातील कामगिरी लक्षात घेऊन त्यांना न्यायमूर्तिपदी कायम करण्यात येते.

 

Web Title: Notification of appointment of new judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.