तुली पब्लिक स्कुलला आदिवासी विभागाची नोटीस
By Admin | Updated: January 7, 2017 22:21 IST2017-01-07T22:21:22+5:302017-01-07T22:21:22+5:30
शाळेतील मुलीच्या शोषणप्रकरणी आदिवासी विकास विभागातर्फे तुली पब्लिक स्कुलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आ

तुली पब्लिक स्कुलला आदिवासी विभागाची नोटीस
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ७ - शाळेतील मुलीच्या शोषणप्रकरणी आदिवासी विकास विभागातर्फे तुली पब्लिक स्कुलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त एस. डब्ल्यु. सावरकर यांनी दिली.
या संदर्भात पत्रकाद्वारे त्यांनी कळविले आहे की, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंर्तगत पीडीत मुलगी ही तुली पब्लिक स्कुल, बोकारा, कोराडी रोड, नागपूर या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. तुली पब्लिक स्कुल, बोकारा, कोराडी रोड, नागपूर येथे प्रकल्प अधिकारी, नागपूर तसेच शाळेचे पालक सचिव तथा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी. बी. पगाडे व तीन महिला कनिष्ठ शिक्षण विकास अधिकारी यांच्या पथकाने ४ जानेवारी रोजी भेट दिली. या भेटीच्या वेळी विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान सहा विद्यार्थिनींनी त्यांच्या जबाबात तेथील माजी कर्मचा-याच्या वर्तणुकीविरुध्द तक्रार केली आहे. त्याप्रमाणे या घटनेबाबत संस्थेने या कार्यालयास वेळीच अवगत करुन न देता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या सबबीखाली त्यांच्याविरुध्द कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
या संदर्भात आज अप्पर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. कोराडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पठाण, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नयन कांबळे, कनिष्ठ शिक्षण अधिकारी डी. बी. पगाडे , अंबादे, आर.टी. आय. अॅक्शन कमेटीचे शहीद शरीफ, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत आणि तुली व्यवस्थापन यांच्या समक्ष चर्चा करण्यात आली.
संबंधित मुलींना बाल न्यायालयासमोर सादर करणार
पीडित मुलींना संरक्षणाची गरज असल्यामुळे आणि घटनेची सत्यता पडताळण्यासाठी बाल कल्याण समिती (बाल न्यायालय) यांच्यासमक्ष त्यांचा जबाब नोंदविण्याची गरज आहे. त्यानंतर बाल न्यायालयासमोर पुढील आठवड्यात संबंधित मुलींना उपस्थित करण्याबाबत प्रकल्प अधिकारी नागपूर यांनी आदेश दिले आहेत.