कर भरणाऱ्यांनाही नोटीस

By Admin | Updated: July 3, 2014 00:50 IST2014-07-03T00:50:42+5:302014-07-03T00:50:42+5:30

नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांनाही मनपाच्या कर आकारणी विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मात्र त्रास

Notice to tax payers | कर भरणाऱ्यांनाही नोटीस

कर भरणाऱ्यांनाही नोटीस

मनपाचा विचित्र कारभार : हजारो रुपयांच्या कर आकारणीमुळे नागरिक त्रस्त
नागपूर : नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांनाही मनपाच्या कर आकारणी विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
मनपाच्या कर विभागातर्फे नागरिकांना कर आकारणीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. परंतु यात मोठा गोंधळ करण्यात करण्यात आला आहे. कवेलू आणि टिनाचे शेड असलेल्या झोपडपट्टीधारकांवर ६ हजार ते २० हजार रुपयांपर्यंतची कर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपुरातील हजारो नागरिकांना याच प्रकारची थकबाकीची नोटीस पाठविण्यात आली आहे. उदाहरणार्थ मेकोसाबाग येथील फुलाबाई नीलकंठ गजभिये यांनी २००९ ते २०१२ पर्यंत २४९३ रुपये घर टॅक्स भरला आहे. त्यांच्याकडे त्याची रीतसर पावतीसुद्धा आहे. त्यांच्याकडून २०१२ ते २०१४ या कालावधीतील कर आकारणी करायला हवी होती. परंतु त्यांना २००८ ते २०१४ पर्यंत १४,९०४ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे.
मेकोसाबाग येथीलच लक्ष्मण गणवीर यांनीसुद्धा गेल्यावर्षी नियमितपणे कर भरला.
परंतु त्यांना २०१२ ते २०१४ या कालावधीसाठी ९६६३ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली. याच प्रकारे उत्तर नागपुरातील बेझनबाग, मेकोसाबाग, इंदोरा तर दक्षिण नागपुरातील मानेवाडा, बजरंगनगर आदी परिसरातील नागरिकांना कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)
एकाच घरात राहणाऱ्या दोघांना वेगवेगळा कर
लुंबिनीनगर येथे भूषण हरिदास पाटील, मनोज हरिदास पाटील यांचे सिमेंट शीटाचे एक घर आहे. एकाच घरात दोघे भाऊ आपल्या परिवारासह वेगवेगळे राहतात. त्यापैकी दोघांनाही कर आकारणीची नोटीस आली. भूषणला २०१० ते २०१४ या कालावधीची एकूण कर आकारणी २०,९६४ रुपये तर त्याच घरात राहणाऱ्या मनोजला मात्र २००८ ते २०१४ या कालावधीसाठी ९१८७ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांची टाळाटाळ
बेझनबाग, मेकोसाबाग, इंदोरा, बजरंगनगर, मानेवाडा येथील नागरिकांनी झोन कार्यालयात जाऊन विचारणा केली असता, अधिकारी व्यवस्थित उत्तर न देता टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जायचे तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Notice to tax payers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.