लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या ऑटोरिक्षा चालक व मालकांना आर्थिक मदत करण्यात यावी अशा विनंतीसह विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला नोटीस बजावून याचिकेवर ८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे ऑटोरिक्षा चालक व मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विदर्भात सुमारे सव्वा लाख ऑटोरिक्षा चालक व मालक आहेत. या व्यवसायावर त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय अवलंबून आहेत. लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय ठप्प झाल्याने सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिल्ली, आंध्र प्रदेश व केरळ राज्यातील ऑटोरिक्षा चालक व मालकांना सरकारकडून सात हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. अशीच मदत महाराष्ट्र सरकारनेही करावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. एस. एस. सन्याल यांनी कामकाज पाहिले.
ऑटोचालकांना आर्थिक मदतीच्या याचिकेवर राज्य सरकारला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:48 IST
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या ऑटोरिक्षा चालक व मालकांना आर्थिक मदत करण्यात यावी अशा विनंतीसह विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
ऑटोचालकांना आर्थिक मदतीच्या याचिकेवर राज्य सरकारला नोटीस
ठळक मुद्देहायकोर्ट : ८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश