वीज मीटर कापण्यापूर्वी मिळणार सूचना
By Admin | Updated: August 17, 2014 00:51 IST2014-08-17T00:51:35+5:302014-08-17T00:51:35+5:30
एसएनडीएल संदर्भात वीज ग्राहकांच्या समस्या सोडवून त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी फुटाळा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एसएनडीएलच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहक जनता

वीज मीटर कापण्यापूर्वी मिळणार सूचना
प्रशांत पवारांच्या प्रयत्नांना यश : मनसे, एसएनडीएल अधिकाऱ्यांचा जनता दरबार
नागपूर : एसएनडीएल संदर्भात वीज ग्राहकांच्या समस्या सोडवून त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी फुटाळा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एसएनडीएलच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहक जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यात मीटर कापण्यापूर्वी ग्राहकांना १५ दिवस आधी सूचना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वीज ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी जनता दरबाराचे आयोजन केले. जनता दरबारात फुटाळा वस्तीतील ३०० नागरिकांनी आपल्या समस्या एसएनडीएलचे अधिकारी तसेच मनसेचे प्रशांत पवार यांच्यापुढे मांडल्या. या भागातील ग्राहकांच्या मीटरचे केवळ दोन महिन्यांचे रिडींग घेऊन सातत्याने सहा-सहा महिने देयके पाठविण्यात येत होती. या तक्रारी करणाऱ्या ग्राहकांची मीटर तपासणी करून त्यांना सुधारित देयके देण्यात आली. याशिवाय अॅव्हरेज देयक फक्त दोन महिन्यापुरते देण्यात येईल, ही बाब अधिकाऱ्यांनी मान्य केली. त्याच प्रमाणे मीटर कापण्यापूर्वी ग्राहकांना १५ दिवस आधी सूचना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे अॅव्हरेज देयक आल्यास एसएनडीएलचे अधिकारी गौरव गुप्ता यांच्याशी संपर्क साधून सुधारित देयक घ्यावे, तोवर वीज देयकाची रक्कम भरू नये आणि अशा प्रकरणात मीटर कापण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मीटर बदलविताना नवे मीटर नि:शुल्क लावण्यात येईल. सूर्योदयापूर्वी कुणीही मीटर तपासण्यास येणार नाही. आल्यास मनसेच्या कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बीपीएल ग्राहकांना ३० युनिटपर्यंत ७६ पैसे आकारण्यात येतात. परंतु प्रशांत पवार यांनी बीपीएल ग्राहकांना १५० युनिटची मागणी केली.
हे ऊर्जा मंत्रालयाचे काम असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्यावर पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मनसेच्यावतीने बुधवारपासून नागपूरात जनता दरबार घेण्यात असून पुढील जनता दरबार बुधवारी सुरेंद्रगड, गुरुवारी गिट्टीखदान, शुक्रवारी फ्रेंड्स कॉलनी, शनिवारी झिंगाबाई टाकळी, मानकापूर, गोधनी, सोमवारी गड्डीगोदाम, मंगळवारी भोईपुरा, बुधवार दक्षिण नागपूर, गुरुवार उत्तर नागपूर येथे होईल.
जनता दरबारात एसएनडीएलचे अधिकारी, प्रशांत पवार यांनी फुटाळा वस्तीतील सुनंदा डोंगरे, गुणाबाई ठवकर, रमाबाई आत्राम, अनसूया भालेकर, रामदास धुर्वे, गंगाधर कटरे यांच्यासह असंख्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले. यावेळी मनसेचे मिलिंद महादेवकर, राकेश बांगरे, संतोष गौर, ललित गुहे, भरत डोंगरे, सुखदेव उमरेडकर, सतीश चौकसे, शांती गोरवणे, स्मिता उईके, सीमा मडावी, मयुरी कावेरी, नामदेव चौधरी, रवि वराडे, मोहन पथे, पप्पू अंधारे, अजय डबीर, मंगेश पात्रीकर, मंगेश सुरावार उपस्थित होते. (प्रतिनिधी)