आयकर प्रकरणात माजी मंत्री सतीश चतुर्वेदींना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:57 IST2018-03-17T00:57:12+5:302018-03-17T00:57:26+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २००५ मधील आयकरसंदर्भातील प्रकरणात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना नोटीस बजावून १३ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

आयकर प्रकरणात माजी मंत्री सतीश चतुर्वेदींना नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २००५ मधील आयकरसंदर्भातील प्रकरणात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना नोटीस बजावून १३ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
याविषयी आयकर विभागाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. आयकर विभागानुसार, चतुर्वेदी यांनी एकूण १५ लाख ७८ हजार रुपये उत्पन्न दाखवून ३१ आॅक्टोबर २००५ रोजी आयकर जमा केला होता. त्यानंतर आयकर विभागाच्या तपास कक्षाला महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली. त्यामुळे पुढील तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला. तपासानंतर चतुर्वेदी यांचे एकूण उत्पन्नांचे ९८ लाख ६० हजार रुपये मूल्यांकन करण्यात आले. त्याविरुद्ध चतुर्वेदी यांनी आयकर अपिलीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते. त्यांचे अपील मंजूर करण्यात आले. त्या निर्णयाला आयकर विभागाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विभागातर्फे अॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.