भाजपाला मतदान करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांना नोटीस

By Admin | Updated: April 7, 2017 02:57 IST2017-04-07T02:57:57+5:302017-04-07T02:57:57+5:30

आशीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत भाजपाला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा नगरसेवकांना काँग्रेसचे शहर अध्यक्ष ...

Notice to Congress corporators who voted for BJP | भाजपाला मतदान करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांना नोटीस

भाजपाला मतदान करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांना नोटीस

शहर अध्यक्षांनी मागविले स्पष्टीकरण : शिस्तभंग कारवाई होणार
नागपूर : आशीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत भाजपाला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा नगरसेवकांना काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपण कुणाच्या आदेशावरून भाजपाला मतदान केले, याचे स्पष्टीकरण सात दिवसात सादर करण्याच्या सूचना देत अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आशीनगर झोनमध्ये बसपाचे सात, काँग्रेसचे सहा व भाजपाचे तीन नगरसेवक आहेत. झोन सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे मनोज सांगोळे, भावना लोणारे, दिनेश यादव, नेहा निकोसे, परसराम मानवटकर या पाच नगरसेवकांनी भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे यांना मतदान केले होते. तर नगरसेवक संदीप सहारे मतदानाला अनुपस्थित राहिले होते.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतरही काँग्रेसच्या नगरसेवकांनी थेट भाजपाला मतदान केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मात्र, त्यानंतरही संबंधित नगरसेवकांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली नाही. शहर काँग्रेसकडून नगरसेवकांना अभय असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्तानंंतर शहर काँग्रेसने संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
निवडणुकीत घडलेल्या प्रकाराबद्दल शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभापतिपदासाठी थेट भाजपाला मतदान केल्यामुळे काँग्रेसवर ताशेरे ओढल्या गेले. याची गंभीर दखल घेत शहर अध्यक्ष ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्याच्या अहवालाची वाट न पाहता थेट संबंधित नगरसेवकांनाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, झोन सभापतीच्या निवडणुकीत कुठलीही सूचना नसताना आपण भाजपाच्या बाजूने हात उंचावून मतदान केले. यासाठी आपल्याला कुणी निर्देश दिले होते, कुणी असा असा निरोप दिला होता का? काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी असे भाजपाला मतदान करणे शिस्तभंगात मोडते. तरी आपण आपले म्हणणे सात दिवसात कळवावे. अन्यथा आपल्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव शिस्तपालन समितीकडे पाठविला जाईल. शहर अध्यक्षांच्या या नोटीसमुळे आता संबंधित नगरसेवकांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
झोन सभापतीच्या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे अनुपस्थित होते. सहारे यांनाही महत्त्वाच्या निवडणुकीत अनुपस्थित राहण्याचे कारण पक्षाला द्यावे लागणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Notice to Congress corporators who voted for BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.