स्थायी समिती अध्यक्ष संतापले : वेतन कपात होणारनागपूर : महापालिका प्रशासनावर वचक निर्माण करीत सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या २२ अधिकाऱ्यांना स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. ही नोटीस जारी होताच अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. महापालिकेचे अधिकारी स्थायी समितीच्या बैठकीला फारसे महत्त्व देत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. यामळे बैठकीत चर्चेला येणाऱ्या बहुतांश विषयांवर विभागाते मत नोंदविले जात नाही. परिणामी प्रस्ताव स्थगित ठेवावे लागतात. ही पहिली वेळ आहे की, स्थायी समितीने गंभीर दखल घेत अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. अनुपस्थितीबाबत तत्कालीन अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी देखील अधिकाऱ्यांना फटकारले होते. प्रकल्पांमध्ये होत असलेल्या विलंबासाठी जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांची वेतन कपात करण्याचा प्रस्तावदेखील ठाकरे यांनी तयार केला होता. मात्र, नंतर त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. सोमवारी स्थायी समितीची बैठक सुरू झाली तेव्हा बहुतांश अधिकारी गैरहजर होते. बैठकीत अपर आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी आदी उपस्थित होते. अर्ध्या तासापर्यंत एकामागून एक अधिकाऱ्यांचे येणे सुरू होते. याची गंभीर दखल घेत अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी अनुपस्थित व विलंबाने येणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस जारी करीत एक दिवसाचे वेतन कपात करण्याची शिफारस केली. अधिकाऱ्यांसह सहा झोनच्या सहायक आयुक्तांनाही नोटीस जारी करण्यात आला आहे. यात लक्ष्मीनगर झोनचे गणेश राठोड, धंतोली झोनचे सुभाष जयदेव, नेहरूनगर झोनचे महेश मोरोणे, गांधीबाग झोनचे राजू भिवगडे, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त डी.डी. पाटील, आसीनगर झोनचे हरीश राऊत यांचा समावेश आहे. अध्यक्ष बोरकर यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस जारी करीत अनुपस्थित राहण्याचे व विलंबाने येण्याचे स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित निर्णय कळविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
मनपाच्या अनुपस्थित अधिकाऱ्यांना नोटीस
By admin | Updated: July 15, 2014 01:17 IST